जालन्यातील मंठा तालुक्यातील तळणी जवळील शिरपूर येथे वृद्ध दाम्पत्याचा राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले. रविवारी सकाळी घटना उघड होताच परिसरात एकच खळबळ उडाली. धोंडिबा कानुजी कोकाटे (80) आणि वच्छलाबाई धोंडिबा कोकाटे (74) अशी मयत जोडप्याची नावे आहेत.
मंठा तालुक्यातील तळणी परिसरातील शिरपूर गावातील आदिवासी वस्तीवरील मुंगसाजी नगरात ही घटना उघडकीस आली. धोंडिबा आणि त्यांची पत्नी वच्छलाबाई यांना चार मुले आहेत. त्यातील एक गावात तर तिघे बाहेरगावी वास्तव्यास आहेत.
हे वृद्ध दाम्पत्य गेल्या 15 वर्षापासून शिरपूर गावातील आदिवासी वस्तीवर वास्तव्यासाठी आलेले होते. हे वृद्ध दाम्पत्य शेळ्या पालन करून उदरनिर्वाह करीत होते. या मृत दाम्पत्याने आठ-दहा दिवसांपूर्वी स्वत:जवळ असलेल्या बकर्यांची विक्री केली होती. त्यातून त्यांना दीड ते दोन लाख रूपये मिळाले होते. पैशासाठीच त्यांची हत्या झाल्याची चर्चा परिसरात दबक्या आवाजात सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच तळणीसह मंठा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह मंठा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पुढील तपास मंठा पोलीस करीत आहेत.