जालना- पोलिसांनी लावला चार लाखांच्या चोरीचा छडा

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील राजेवाडी शिवारात घरफोडी करून 4 लाख 38 हजार रुपयांचे दागिने व 12 हजार रोख रक्कम चोरून नेणाऱ्या आरोपींचा बदनापूर पोलिसांनी छडा लावून आरोपींकडून संपूर्ण मुददेमाल जप्त करून न्यायालयाच्या आदेशाने फिर्यादीस पोलिस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या उपस्थित सुपूर्द करण्यात आला.

बदनापूर तालुक्यातील राजेवाडी येथील रणजित अंबरसिंग घुसिंगे यांच्या घरी 26 फेब्रुवारी 2020 रोजी रात्री घरफोडी करून चोरट्यांनी 4 लाख 38 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व 12 हजार रुपये रोख असे जवळपास साडे चार लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या बाबत घुसिंगे यांनी बदनापूर पोलिस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली होती. फिर्याद प्राप्त होताच पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी या प्रकरणी सखोल तपास करण्यासाठी पथकांची नेमणूक करून सदर तपाससह पोलिस निरीक्षक शाहूराज भिमाळे यांच्याकडे दिला होता. सदरील पथकाने पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, पोलिस उपविभागीय अधिकारी सुधीर खिराडकर, बदनापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास केला. हा तपास करून सदर घरफोडीतील आरोपीस अटक करून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला होता.

दरम्यान बदनापूर न्यायालयाने आदेश देऊन सदरील मुद्देमाल फिर्यादीस देण्याचे सांगण्यात आल्यानंतर आज 17 ऑक्टोबर रोजी पोलिस निरीक्षक खेडकर व इतरांच्या उपस्थित फिर्यादी रणजित घुसिंगे यांना 14 तोळ्यांचे सोन्याचे दागिने व रोख 12 हजार रुपये असा एकूण 4 लाख पन्नास हजार रुपयांचा ऐवज परत करण्यात आले. अवघ्या सात ते आठ महिन्यांत बदनापूर पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपीस ताब्यात घेऊन मुद्देमालही फिर्यादीस मिळवून दिल्याबद्दल जनमानसात पोलिसांचे कौतुक होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या