जालना – सोमठाणा अप्पर दुधना प्रकल्पाच्या सांडव्याच्या भिंतीतून पाणी झिरपू लागले, परिसरात भीतीचे वातावरण

502

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथील अप्पर दुधना प्रकल्पाच्या सांडव्याच्या भिंतीतून पाणी झिरपत असल्याने परिसरातील नागरिकांत भितीचे वातावरण आहे. सद्य परिस्थितीत 14 फूट क्षमता असणारा या प्रकल्पात 12 फूट पाणी असून पाण्याच्या दाबाने सांडव्याच्या भिंतीतून पाणी झिरपत आहे.

बदनापूर तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेला अप्पर दुधना या प्रकल्पाच्या कामाला 1962 वर्षी सुरुवात होऊन 1965 या वर्षी हा प्रकल्प पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण करण्यात आलेले होते. या प्रकल्पापासून एकूण 13 गावांना सिंचनाचा फायदा होतो. गोदावरी नदीच्या खोऱ्यात सदरील प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र जवळपास 248 चौ. कि.मी. असले तरी याच नदीवर भाकरवाडी येथेही एक लघु प्रकल्प झाल्याने हा प्रकल्प भरल्यानंतरच या प्रकल्पात पाणी येते. संपूर्ण क्षमतेने भरल्यास या धरणात एकूण पाणी साठा 15.39 द.ल.घ. मी. होतो. या धरणातील उजव्या कालव्याची लांबी जवळपास 8 किलोमीटर इतकी आहे. या प्रकल्पाची देखभाल पाटबंधारे विभागाकडे सध्या आहे. या प्रकल्पाची पाळू जवळपास 2 किलोमीटर लांबीची असून  सांडवा जवळपास 280 मिटर एवढा असून हा प्रकल्प भरल्यानंतर या सांडव्यातून पाणी दुधना नदी पात्रात जाते.

या वर्षी जून महिन्यांपासून पावसाने बरसात केलेली असून वार्षिक सरासरी इतका पाऊस आतापर्यंतच कोसळल्यामुळे व या प्रकल्पाच्या वरील भागाचे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणी साठा होत आहे. 14 फूट क्षमतेच्या या धरणात शनिवार 8 ऑगस्टपर्यंत 12 फूट पाणी जमा झालेले आहे. या पाण्याच्या दाबामुळे 280 मीटर सांडवा असलेल्या या धरणातून सांडव्यातून पाणी झिरपू लागले आहे. सदरील 280 मीटर सांडव्याची पाळू ही दगड-सिमेंटाने बांधलेली असून या पाळूच्या 130 मीटर ते 17प मीटर दरम्यान 40 मीटरमधून पाणी झिरपत असल्यामुळे परिसरातील भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. पाटबंधारे विभागाने तात्काळ याची दखल घेऊन सांडव्यातून पाणी झिरपू नये म्हणून उपाययोजना करण्याची गरज आहे.

या बाबत पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता विराज बोधने यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आमच्या विभागामार्फत 26 जून 2020 रोजी सदरील प्रकल्पाचे स्ट्रकचर ऑडिट करण्यात आले होते, त्यानुसार जेथे गरज होती अशा जॉईंटच्या ठिकाणी रासायनिक प्रक्रिया केलेले केमिकलद्वारे सदर जाँईंट भरूनही काढलेले आहे. तरीही ज्या ठिकाणी सांडवा झिरपत आहे त्याची पाहणी करण्यात आलेली असून परिस्थितीवर पाटबंधारे विभाग लक्ष ठेऊन असून नागरिकांनी कोणतीही काळजी करू नये असे आवाहन केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या