जलशक्ती अभियान उपक्रमाला नगर जिल्ह्यात यश

353

सततच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ग्रामीण भागात शुद्ध व पिण्याचे पाणी मिळावे यासाठी महाराष्ट्र व्हीलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाँडेशन, युनिसेफ इंडिया आणि केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या जलशक्ती अभियानाला नगर जिल्ह्यात यश मिळाले असून जिल्ह्यातील 8 गावांमध्ये 1 कोटी 92 लाख लिटर पाण्याची साठवण करण्यात आली आहे.

जलशक्ती अभियान ही मोहिम आखून राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये 20 गटांची निवड केली होती. यात लातूर जिल्ह्याचा समावेश आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा 8 जुलै 2019 ते 15 सप्टेंबर 2019 असा होता. दुसरा टप्पा 1 ऑक्टोबर रोजी सुरू झाला आणि 30 नोव्हेंबर रोजी तो संपला. या कालावधीत नगर जिल्ह्यातील 8 गावांमधून युनिसेफच्या तांत्रिक साह्याने जलशक्ती अभियान राबविण्यात आले. अभियान कालावधीत जमिनीत पाणी जिरविण्यासाठी खड्डे खोदणे, विहिरीमधील गाळ काढणे अशी जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत. वनीकरणाची कामे, व्हीएसटीएफ प्रकल्पातील 8 गावात प्रभावीपणे राबविण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यात विविध विभागांचा एकत्रित सहभाग आणि इतर संस्थांचा पाठिंबा यामुळे या गावात शोष खड्डे, पुनर्भरणासाठी विहिरी आणि नलिका कूप, पावसाचे पाणी जिरवणे आणि नाल्यांमधील गाळ काढणे अशी कामे झाली. या कामांवर 11 लाख 48 हजार रुपये खर्च आला. मनरेगा निधी आणि बाह्य संस्थात्मक निधी यातून हा खर्च करण्यात आला. या कामांचा लाभ 379 कुटुंबाना मिळाला. तसेच व्यापक वनीकरणाचा भाग म्हणून या 8 गावांमध्ये 11 हजार 300 झाडे लावण्यात आली.

मुख्यमंत्री ग्रामविकास प्रतिनिधीचे जलशक्ती अभियानासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण किनवट येथे आयोजित करण्यात आले होते. जिल्हा प्रशासन आणि विविध विभाग प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली व्हीएसटीफच्या टिमने 8 गावांतून 23 बांधकामातून 1 कोटी 92 लाख लिटर पाण्याची साठवणूक केल्याने आगामी काळात या कामामुळे या भागात पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहे.

जामखेड आणि कर्जत गटातील 8 ग्रामपंचायतींमध्ये व्हीएसटीएफचे काम सुरू आहे. तेथील सर्व म्हणजे 8 विकास प्रतिनिधी जलशक्ती अभियानच्या प्रशिक्षणात सहभागी झाले होते. प्रशिक्षणानंतर या प्रतिनिधींनी व्हीएसटीएफचे काम सुरू असलेल्या गावांमध्ये जलशक्ती अभियानमधील कामांची अंमलबजावणी केली. प्रत्येक प्रतिनिधीने त्याच्या समूहातील ग्रामपंचायत सदस्यांना जलशक्ती अभियानाबद्दल माहिती दिली आणि त्यांच्या गावासाठीच्या विकास योजनेतील कामांची माहिती दिली. ग्राम पंचायत सदस्यांना माहिती देण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून महिला आणि पाण्याचा वापर करणाऱ्या इतर सर्व संबंधितांना त्यांनी विश्वासात घेतले. या प्रक्रियेच्या वेळी मान्सून पावसाची सुरुवात झालेली असल्यामुळे बैठकांना हजेरी कमी असे. परंतु गावातील सक्रिय कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून सर्व गाव या अभियानात सामील होईल याची खबरदारी घेतली. गावकऱ्यांना या अभियानात युनिसेफच्या तांत्रिक साह्याखेरीज पाणी फाउंडेशन, भारतीय जैन संघटना आणि बारामती ऍग्रो या संस्थांचा पाठिंबा मिळाला.

योजनेतील गावांमध्ये पाणी साठवण्यासाठी 23 बांधकामे झाली आणि पाणी पुनर्भरणासाठी कूप तयार झाले. एकूण साठवण क्षमता 1 कोटी 92 लाख लिटर एवढी झाली. या बांधकामांसाठी 11 लाख 48 हजार रुपये खर्च आला. या बांधकामाचा लाभ 379 कुटुंबाना होईल आणि 1776 व्यक्तींना विविध कामांसाठी पाणी उपलब्ध होईल. काम सुरू असताना जिल्हा आणि गाव पातळीवरील कार्यकर्त्यांनी आणि अधिकाऱ्यांनी व्हॉट्सप ग्रुप करून आणि इतर समाजमाध्यमांचा वापर करून एकमेकांशी संपर्क ठेवला आणि कामाच्या प्रगतीची माहिती एकमेकांना दिली. जिल्हा पातळीवर नियोजन आणि समन्वय ठेवल्यामुळे त्यांना निधीसाठी पाठपुरावा करणे आणि उपलब्ध सामग्रीचा कुशल वापर करणे शक्य झाले. हा उपक्रम आपला स्वतःचा आहे या भावनेतून गावकऱ्यांनी निधीतील तफावत लोकवर्गणी गोळा करून भरून काढली.

आपली प्रतिक्रिया द्या