
तालुक्यातील हाळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालयाच्या वसतिगृहात रॅगिंगचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याला सीनियर विद्यार्थ्यांनी खोलीत घुसून बेदम मारहाण केली. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात चौघांची नावे निष्पन्न झाली असून, इतर पाच ते सहा अनोळखी विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी वेदान्त दगडू तळुले (वय 18, रा. निमगाव घाणा, ता. अहिल्यानगर) याने याच वर्षी ‘बी.एस्सी. ऍग्री’साठी हाळगाव महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. 7 सप्टेंबर रोजी सकाळी तो कॉलेजमध्ये आला. रात्री 10 वाजता आपल्या दोन नवीन मित्रांसह रूममध्ये आराम करत असताना काही सीनियर मुले दारात आली. त्यांनी दरवाजा उघडण्यास सांगून फिर्यादीला नाइट ड्रेसवरच त्यांच्या रूममध्ये बोलावले. तेथे त्याचा मोबाईल काढून घेत रांगेत उभे करून खाली मान घालून उभे राहण्यास भाग पाडले आणि ‘आम्ही सांगू तसेच वागावे लागेल,’ अशी दमदाटी केली. फिर्यादीने याची माहिती रेक्टर विवेकानंद कुलकर्णी यांना दिली. कुलकर्णी यांनी मध्यस्थी करून प्रकरण मिटवले.
रेक्टरकडे तक्रार केल्याचा राग मनात धरून 8 सप्टेंबरच्या मध्यरात्री सीनियर विद्यार्थ्यांनी वेदान्तच्या खोलीची कडी तोडून आत प्रवेश करत त्याला बेदम मारहाण केली. यावेळी झालेला आरडाओरडा ऐकून रेक्टर आले. त्यावेळी फिर्यादीच्या शेजारील रूममधील दोन मित्रांनाही मारहाण झाल्याचे समोर आले. एवढेच नव्हे, तर आरोपींनी हॉस्टेलच्या मध्यभागी जमाव करून रेक्टरसमोरच ‘पोलीस स्टेशनला फोन करा, पोलीस आमचे काय वाकडे करणार?’ असे म्हणून पोलिसांनाही आव्हान दिले. विद्यार्थ्यांनी कॉल करताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 9 सप्टेंबर रोजी वेदान्तने वडिलांसोबत येऊन फिर्याद दिली.
पोलिसांनी हृतिक दत्तात्रय शेळके, पीयूष कुंभार, सुशील हेमंत मालकाने आणि प्रतीककुमार वाघमोडे या चौघांविरुद्ध आणि इतर पाच-सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.





























































