कर्जत तालुक्यातील पाणी प्रश्नाला काँग्रेस जबाबदार

23

सामना प्रतिनिधी। जामखेड

कर्जत तालुक्याचा भाग हा अविकसितच रहावा म्हणून सिंचन प्रकल्प मार्गी लागू नयेत असेच प्रयत्न काँग्रेस सत्तेच्या काळात झाले. मात्र युती सरकारने तालुक्यातील अमृतलिंग सारख्या महत्वपूर्ण प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय घेवून, या भागाच्या पाणी प्रश्नाच्या सोडवणूकीसाठी निर्णय घेण्याची धमक दाखविली असे प्रतिपादन पालकमंत्री प्रा.ना.राम शिंदे यांनी केले.

तालुक्यातील खर्डा येथे महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत पालकमंत्री ना.शिंदे यांनी या भागाच्या पाणी प्रश्नाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकारच जबाबदार असल्याचा ठपका ठेवला. वर्षानुवर्षे या भागाचे सिंचन प्रकल्प मार्गी लागू नयेत असेच प्रयत्न झाले. या भागाचा पाणी प्रश्न सुटला तर हा परिसर विकसित होईल अशी भिती या नेत्यांच्या मनात होती त्यामुळेच या भागाला नेहमीच सापत्नतेची वागणूक मिळाली असल्याचे ना.शिंदे म्हणाले.

या प्रसंगी बोलताना महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले की, निवडणुकीत मतदारांपुढे मांडण्यासाठी विरोधकांकडे कोणतेही मुद्दे आता राहीलेले नाहीत. केवळ व्यक्तिद्वेषाचे राजकारण त्यांच्याकडून आता सुरू झाले आहे. आम्ही शेतक-यांच्या आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर बोलतो, यांना मात्र प्रश्नांचे कोणतेही देणेघेणे नाही. शेतक-यांचे प्रश्न आणि सिंचनाचे प्रश्न सोडविण्यासाठी संसदेमध्ये माझा प्राधान्यक्रम असेल अशी ग्वाही त्यांनी दिली. याप्रसंगी वैजनाथ पाटील, संजय गोपाळ घरे, रविदादा सुरवसे, भगवानराव मुरुमकर, सुर्यकांत मोरे, सुभाष आव्हाड, मकरंद काशीद, सुधीर राळेभात यांच्यासह विविध पदाधिकारी, ग्रामस्थ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या