जामखेड- रानडुक्करांच्या उपद्रवाने शेतकरी हैराण, अनेक जमिनी ठेवल्या पडिक

572

जामखेड तालुक्यातील साकत परिसरात रानडुकरांनी हैदोस घालत शेतकऱ्यांच्या ज्वारी, गहू, मका, ऊस पिकांचे मोठे नुकसान केले आहे. आधीच पाउस पडत नसल्याने शेतकरी वर्ग हैराण असताना असे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. इतर वन्य प्राणी फक्त पिकांचे नुकसान करत होते पण रानडुकरांना पिकातून हुसकावण्याचा प्रयत्न केला तर ते हल्ला करत असून त्यात अनेक लोक जखमी झाले आहेत. रानडुकरांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांना जमीनी पडिक ठेवण्याची वेळ आली आहे. वनविभागाने तत्काळ रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पुढे येत आहे.

सध्या शेतीमालाची नासाडी अनेक वन्यजीव करत असले तरी रानडुकरांनी तर कहरच केला आहे. उसाला शेतकऱ्यांना रात्री राखण करण्याची वेळ आणली आहे. रात्र रात्र जागूनही रानडुकरे ऊसासह मका, भुईमुग, ज्वारी पिकांची नासाडी केली जात आहे. जामखेड तालुक्यातील साकत, देवदैठण, दिघोळ, जातेगाव, मोहरी, धामणगाव, तेलंगशी या भागात सध्या रानडुकरांनी धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत सुमारे तीस लोकांना रानडुकरांनी जखमी केलेले आहे. काही लोक तर कायमस्वरूपी अपंगत्व आलेले आहे.

हंगामी पाण्याची सोय असणारे शेतकरी रानडुक्करांच्या भितीने रात्री पिकांना पाणी देतच नाहीत. परिसरात आठ दिवस दिवसा आठ व नंतर आठ दिवस रात्री आठ तास महावितरण वीज पुरवठा करते. दिवस एकमेकांच्या सोबतीने शेतकरी पिकांना पाणी देतात, पण रात्री मात्र रानडुकरांच्या भीतीने पिकांना पाणी देण्याचे बंद केले आहे. कारण अनेक शेतकऱ्यांवर रात्री रानडुकरांनी हल्ले केले आहेत. या भीतीने शेतकरी घराबाहेरच पडत नाहीत. यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे.

एका कळपात 10-12 ते जास्तीत जास्त 40-50 रानडुकरे असतात. दिवसभर जंगलात पाण्याच्या ठिकाणी सावलीत रानडुकरे आराम करतात रात्रीच्या वेळी जंगलातून बाहेर पडून एखाद्या शेतात घुसतात. त्यांचे सर्वात आवडते खाद्य म्हणजे भुईमुग व मका होय. परिसरात कोठेही भुईमुग पेरला तर त्यांना त्याचा वास येतो व त्या ठिकाणी येऊन मातीतले शेंगदाणे फस्त करतात. नंतर मक्याची कणसे खातात. सध्या ज्वारीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहेत. तीस चाळीस डुकरे एखाद्या शेतात आली की संपूर्ण शेतातील ज्वारीचे नुकसान करतात. डुकरांनी मोडलेली ज्वारी नंतर इतर गुरेही खात नाहीत. डुकरे उन्हाळ्यात ऊसाच्या पिकाचा आश्रय घेतात.

साकत येथे ग्रामपंचायत सदस्या सोजरबाई वराट या रानडुक्करांच्या हल्ल्यात जाग्यावरच पडून आहेत कायमचे अपंगत्व आले आहे. तर प्रल्हाद वराट, नागनाथ अडसुळ, मंगल अडसुळ यांच्या बरोबर इतर पाच माणसे जखमी झाले आहेत. सावरगाव येथे तीन, मोहरी येथे पाच, दिघोळ येथे चार, जातेगाव येथे तीन अशा सुमारे तीस लोक दोन वर्षात रानडुक्करांच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत.

रानडुक्करानी केलेली पिकाची नुकसान भरपाई मिळावी
रानडुक्कर हा प्राणी शेतकरीसाठी उपद्रवी आहे. काहीही उपाय शेतकरी करू शकत नाही. यावर एकच पर्याय म्हणजे होणारा शेती पिकाच्या नुकसानीवर भरपाई देण्याची तरतूद करावी. या बाबत लोकप्रतिधींनी लक्ष घालून नुकसानाची तरतूद करावी व शेतकरी वर्गाला दिलासा देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी पुढे येत आहे. एकतर शासनाने वनक्षेत्राजवळील शेतकऱ्यांना बंदुकीचे लायसन्स द्यावे व डुकरे मारण्याची परवानगी द्यावी किंवा खास डुकरे मारणारी व पकडणारी टोळी आणून ती पकडून संरक्षित वनक्षेत्रात सोडावीत. शेतीला कंपाऊंड करण्यासाठी शासकीय स्तरावर अनुदान देण्यात यावे. असे केले तर शेतकरी व शेती सुरक्षित राहील. परिसरातील शेतकरी याबाबत आमदार रोहित पवार यांची भेट घेऊन काय करता येईल याबाबत चर्चा करणार असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या