प्रजासत्ताक दिनापूर्वी घातपाताचा कट उधळला, जैशच्या पाच दहशतवाद्यांना अटक

793

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वीच दहशतवाद्यांनी रचलेला घातपाती कारवायाचा कट जम्मू-कश्मीर पोलिसांच्या कारवाईमुळे उधळला गेला आहे. जम्मू-कश्मीर पोलिसांच्या विशेष पथकाने गुरुवारी पाच दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे सर्व दहशतवादी ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेत कार्यरत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगर पोलिसांनी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी पाच दहशतवाद्यांना अटक केली आहे. एजाज अहमद शेख, उमर हमीद शेख, इमतीयाज अहमद चिकला, साहिल फारूक गोजरी आणि नसीर अहमद मीर अशी अटक केलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. या दहशतवाद्यांनी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ला करण्याचा डाव आखला होता.

अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून पोलिसांनी बॉम्ब बनवण्याच्या साहित्य, जिलेटिनच्या कांड्या  आणि अन्य सामान जप्त करण्यात आले आहे. या दहशतवाद्यांनी यापूर्वी खोऱ्यात 2 दहशतवादी हल्ले केल्याचेही उघड झाले.

असा लागला सुगावा
श्रीनगर येथे सीआरपीएफच्या पथकावर 8 जानेवारीला दहशतवादी हल्ला झाला होता. हजरतबलजवळ हबल क्रॉसिंग करताना सीआरपीएफच्या पथकावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता. या हल्ल्यात दोन सामान्य नागरिक जखमी झाले होते. या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती आणि तपास सुरु होता.

तपासादरम्यान सीसीटीव्हीसह ग्रेनेड हल्ल्यात वापरलेले इलेक्ट्रॉनिक साहित्य गोळा करून त्याचे परिक्षण करण्यात आले. यासह गुप्तचर यंत्रणेनेही माहिती दिली. याद्वारे संशयितांच्या ठिकाणांवर व घरांवर छापेमारी करण्यात आली. यावेळी जैश-ए-मोहम्मदच्या मोड्यूलचा भांडाफोड झाला.

आपली प्रतिक्रिया द्या