
जम्मू-कश्मीरमधील किश्तवाडमध्ये सलग तिसऱया दिवशी पाकिस्तानी दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. शोध घेत असताना जवानांनी दहशतवाद्यांचे लपण्याचे एक ठिकाण शोधून काढले. त्यात मोठय़ा प्रमाणात रसद आढळली. स्थानिकांच्या मदतीशिवाय हे शक्य नाही, असे सुरक्षा दलांनी म्हटले आहे. दरम्यान, दहशतवाद्यांच्या ग्रेनेड हल्ल्यात शहीद झालेले हवालदार गजेंद्र सिंह गढिया यांच्यावर अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
किश्तवाडमध्ये शोधून काढलेले ठिकाण हे दगडांनी बनवले असून ताडपत्रीने लपवले होते. घनदाट जंगलात उतारावर बनवलेले हे ठिकाण दुरून दिसत नव्हते. त्यातून दहशतवाद्यांचे नियोजन दिसून येते. सध्या बिलावर, कठुआ येथे दहशतवाद्यांची लहान-मोठी तीन ठिकाणे नष्ट करण्यात आली आहेत, अशी माहिती सुरक्षा दलांनी दिली.
हवालदार गजेंद्र सिंह अनंतात विलीन
‘ऑपरेशन त्राशी-1’ मध्ये शहीद झालेले हवालदार गजेंद्र सिंह गढिया यांना शोकाकुल वातावरणात अंतिम निरोप देण्यात आला. ते मूळचे बागेश्वर येथील बिथ्थी या गावचे रहिवासी होते. दहशतवाद्यांविरोधात शोधमोहीम सुरू असताना दहशतवाद्यांनी जवानांवर ग्रेनेड हल्ला केला. त्यात गजेंद्र सिंह हे गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि आईवडील आहेत. मुलाचे पार्थिव पाहताच आई बेशुद्ध झाली. अंत्ययात्रेदरम्यान संपूर्ण गाव ‘भारत माता की जय’च्या जयघोषाने निनादला होता.
गॅस सिलिंडर, चूल आणि भाज्या
या ठिकाणी गॅस सिलिंडर, चूल, तांदूळ, गव्हाचे पीठ, मसाले, इन्स्टंट नूडल्स, अर्धवट शिजवलेली अंडी आणि ताज्या भाज्या होत्या. बऱयाच काळापासून या ठिकाणाचा वापर होत होता. रेशनच्या प्रमाणावरून असा अंदाज आहे की, दहशतवादी येथे बराच काळ वास्तव्य करणार होते. स्थानिक मदतीशिवाय दहशतवाद्यांपर्यंत एवढी रसद पोहोचणे शक्य नव्हते. असा पुरवठा सीमेपलीकडून शक्य नाही, असे सुरक्षा दलांचे म्हणणे आहे.





























































