कश्मीरात सीमेवर पाकड्यांचा भ्याड हल्ला, कोल्हापुरचा आणखी एक सुपुत्र संग्राम पाटील शहीद

जम्मू-कश्मीरमध्ये नौशेरा सेक्टर येथे पाकडय़ांच्या भ्याड हल्ल्याला जवाब देताना कोल्हापूर जिह्यातील आणखी एक सुपुत्र शहीद झाला. करवीर तालुक्यातील निगवे खालसा येथील जवान हवालदार संग्राम शिवाजी पाटील (35) यांना शुक्रवारी रात्री वीरमरण आले. संग्राम हे हिंदुस्थानी सैन्यदलात 16 मराठा बटालियनमध्ये सेवेत होते.

गेल्या आठवडय़ात ऐन दिवाळी दिवशी आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथील अवघ्या 20 वर्षांचे जवान ऋषिकेश जोंधळे हे जम्मू-कश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याशी लढताना शहीद झाले होते. तर काल मध्यरात्री जिह्यातील आणखी एक सुपुत्र संग्राम पाटील शहीद झाल्याने हळहळ व्यक्त होत असून, पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

गावचा सुपुत्र देशाच्या रक्षणार्थ शहीद झाल्याची बातमी समजताच निगवे खालसा गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली.

डिसेंबरमध्ये येणार होते सुट्टीवर

डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात मी सुट्टीवर येणार आहे, असे फोन करून शहीद संग्राम यांनी घरी सांगितले होते. तसेच त्यांनी गावी नवीन घर बांधण्यासही प्रारंभ केला होता. मात्र, त्यांचे नव्या घराचे स्वप्न अपूर्णच राहिले. शांत, संयमी व मनमिळावू स्वभावाचे संग्राम पाटील शहीद झाल्याचे वृत्त धडकताच, निगवे गाव व परिसरात शोककळा पसरली. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी हेमलता, मुलगा शौर्य (8), मुलगी शिवश्री (2) आणि भाऊ-भावजय असा परिवार आहे.

रविवारी सकाळी होणार अत्यसंस्कार

शहीद जवान संग्राम पाटील यांचे पार्थिव शनिवारी दुपारी पुण्यात दाखल होईल. त्यानंतर रविवारी सकाळी अंत्ययात्रा काढून लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्यसंस्काराची तयारी सुरू असून, ग्रामपंचायतीजवळ क्रीडांगणावर चबुतरा उभारण्यात आला आहे.

– बारावीचे शिक्षण पूर्ण होताच वयाच्या 18 व्या वर्षी संग्राम पाटील हे सन 2002मध्ये 16 मराठा बटालियनमध्ये भरती झाले होते. बेळगाव येथे प्रशिक्षण घेऊन 18 वर्षे त्यांनी सैन्य दलात देशसेवा बजावली आहे. त्यांची 17 वर्षांची (बॉन्ड) केलेली नोकरी गेल्याच वर्षी संपली होती. मात्र, आणखी दोन वर्षांची नोकरी त्यांनी वाढवून घेतली होती. शहीद संग्राम पाटील हे हवालदार पदावर कार्यरत होते.

आपली प्रतिक्रिया द्या