कुपवाडा सीमेवर भयंकर धुमश्चक्री, तीन पाकिस्तानी सैनिक ठार, 14 जखमी

582

पाकिस्तानी लष्कराने कुपवाडा सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करून तुफान गोळीबार केला. पाकिस्तानच्या कुरापतीला हिंदुस्थानी लष्कराने तडाखेबंद उत्तर दिले. या धुमश्चक्रीत तीन पाकिस्तानी सैनिक ठार तर 14 जण जखमी झाले आहेत. हिंदुस्थानी लष्कराने पाकिस्तानच्या सहा चौक्याही नेस्तनाबूत केल्या.

जम्मू-कश्मिरातून कलम-370 हटवण्यात आल्यामुळे पाकिस्तानच्या बुडाला लागलेली आग अजूनही धुमसत आहे. कलम-370 हटवण्यात आल्यापासून पाकिस्तानी लष्कराच्या बंदुका सातत्याने आग ओकत आहेत. आजही कुपवाडा सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कराने ग्रामीण भागाला निशाणा बनवून गोळीबार सुरू केला. गोळीबार सुरू होताच ग्रामस्थांची पळापळ झाली. मात्र हिंदुस्थानी लष्कराने लगेच परिस्थिती नियंत्रणात आणली आणि प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली.

हिंदुस्थानी लष्कराने रुद्रावतार धारण करताच पाकिस्तानी लष्कराची पाचावर धारण बसली. अत्यंत आक्रमकतेने हिंदुस्थानी लष्कराने चढाई करत पाकिस्तानी लष्कराच्या सहा चौक्या नेस्तनाबूत केल्या. या भयंकर धुमश्चक्रीत पाकिस्तानचे तीन सैनिक ठार, तर 14 जण जखमी झाले. पाकिस्तानी लष्कराने केलेल्या उखळी तोफांच्या माऱयात कसबा गावातील एका घराला आग लागली. डोकरी गावात सहा घरांचे नुकसान झाले. गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. कुपवाडानंतर पुंछ, राजौरी, बारामुल्ला सीमेवरही पाकिस्तानी लष्कराने गोळीबार केल्याचे वृत्त आहे.

अतिरेक्यांची घुसखोरीसाठी तडफड
पाकव्याप्त कश्मिरातील अतिरेक्यांच्या छावण्या हिवाळय़ापासून गजबजलेल्या आहेत. या ठिकाणी जवळपास 350 अतिरेकी असून त्यांना हिंदुस्थानात घुसवण्यासाठी पाकिस्तानची तडफड चालू आहे. नीलम घाटातून या अतिरेक्यांना घुसवण्याचे षड्यंत्र पाकिस्तानने रचले आहे. मात्र हिंदुस्थानी लष्कराने सीमेवरील चौक्या पहारे कडक केले असून डोळय़ात तेल घालून गस्त घालण्यात येत आहे. घुसखोरीसाठी मार्गच सापडत नसल्यामुळे पाकिस्तानी लष्कर दररोज सीमेवर गोळीबार करून हिंदुस्थानी लष्कराचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या