जम्मू कश्मीरमध्ये सैन्याला मोठं यश! लश्कर-ए-तोयबाचा कमांडर हैदर याचा खात्मा

1177

जम्मू कश्मीरमधील हंदवाडा इथे झालेल्या चकमकीत हिंदुस्थानच्या चार जवानांसह एक पोलीस कर्मचारी असे पाच जण शहीद झाले. पण, पराक्रमाची शर्थ करून या जवानांनी गाजवलेल्या शौर्याला मोठं यश आलं आहे. कारण, त्या चकमकीत लश्कर-ए -तोयबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर ‘हैदर’चा खात्मा झाला आहे.

हंदवाडा येथील राजवार परिसरात ही चकमक शनिवारपासून सुरू होती. येथील एका घरात स्थानिक नागरिकांना ओलीस ठेवल्याची बातमी सुरक्षा दलांना मिळाली होती. हा परिसर घनदाट जंगलाने वेढलेला असल्याने इथून दहशतवादी ये जा करतात. त्यामुळे सीमाभागात घुसखोरी होण्याचे प्रकार या भागात वरचेवर घडतात. शनिवारीही अशीच घुसखोरी करून नागरिकांना ओलीस ठेवण्याच्या प्रयत्नात दहशतवादी होते.

या घुसखोरीची बातमी सुरक्षा दलांना मिळाली आणि त्यांनी या घराला वेढलं. दहशतवाद्यांना याची कुणकुण लागताच त्यांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. या चकमकीत हिंदुस्थानचे पाच जवान शहीद झाले. मात्र, त्यांनी दोन दहशतवाद्यांचा खात्माही केला. त्यातील एक दहशतवादी हा लश्कर-ए-तोयबाचा कमांडर असल्याचं वृत्त आहे. चकमकीत एक कमांडिंग ऑफिसर, 21 राष्ट्रीय रायफल्सचे एक मेजर, दोन सैनिक आणि एका पोलीस अधिकाऱ्याचा समावेश आहे. शहीद झालेल्या जवानांमध्ये 21 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल आशुतोष शर्मा यांचा समावेश आहे. शहीद कर्नल शर्मा यांनी यापूर्वीही अशा साहसी मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्या होत्या. चकमक संपल्यानंतर घरात अडकून पडलेल्या नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं.

या आधी शनिवारी पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी व जवानांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे असल्याचे समजते. चकमकीनंतर स्थानिकांनी जवानांवर तुफान दगडफेक केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या