J&K सीमाभागात घुसखोरी करणाऱ्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

617

जगात आजघडीला कोरोना रुपी संकटाने घेरलं आहे. पण, या परिस्थितीतही पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. कधी शस्त्रसंधीचं उल्लंघन तर कधी अतिरेक्यांची घुसखोरी असे अनेक प्रकार केले जात आहेत. मात्र, हिंदुस्थानी सैन्य त्यांना चोख प्रत्युत्तर देत आहे. नौशेरा येथे घुसखोरी करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सैन्याला यश आलं आहे.

जम्मू कश्मीरमधील नौशेरा हा भाग हिंदुस्थान-पाकिस्तानचा सीमाभाग आहे. सोमवारी सकाळी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या आत काही घुसखोर दहशतवादी हिंदुस्थानात शिरण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, सीमेवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून असलेल्या हिंदुस्थानी सैन्याने त्यांना कंठस्नान घातलं. या परिसरात शोधमोहीम सुरू असून कसून तपासणी करण्यात येत आहे.

दोन दिवसांपूर्वीच कुलगाम येथे हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आलं होतं. तर बडगाम जिल्ह्यातही सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना पकडलं होतं. अटक केलेल्यांमध्ये दहशतवाद्यांचा म्होरक्या वसीम गनी याचाही समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या