पुलवामात दहशतवादी ठार, लष्कराचा एक जवान शहीद

जम्मू-कश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील कामराजीपोरा येथे आज पहाटे झालेल्या चकमकीत लष्कराने एका दहशतकाद्याला ठार केले. कामराजीपोरात काही अतिरेकी लपून बसले असल्याची खबर लष्कराला मिळाली होती. लष्कराने त्या ठिकाणाला वेढा घातला. परंतु अतिरेक्यांनी जवानांकर गोळीबार सुरू केला. जवानांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत लष्कराचा एक जवान शहीद झाला.

लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सने सीआरपीएफ जवानांबरोबर कामराजीपोरात हे सर्च ऑपरेशन हाती घेतले होते. संपूर्ण परिसरात नाकाबंदी करून जवानांनी अतिरेक्यांना पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. चकमकीत एक जवान जखमीही झाला. त्याला उपचारासाठी लष्कराच्या 92 बेस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जम्मू-कश्मीर पोलिसांनी मंगळवारी कुपवाडा येथे चार दहशतवाद्यांना अटक केली. त्यांच्याकडून एक एके-47 रायफल, दोन पिस्तुली आणि काडतुसे जप्त करण्यात आली.

सहा महिन्यांत चार दहशतवादी संघटनांचे प्रमुख यमसदनी
जम्मू-कश्मीरमध्ये गेल्या सहा महिन्यांमध्ये लष्कराने चार दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांना यमसदनी धाडले आहे. जूनमध्ये लष्कराने हिजबुल मुजाहिदीन आणि इस्लामिक स्टेट या संघटनांच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. त्यातील एक हिजबुलचा प्रमुख होता. लष्करी जवान आणि पोलिसांनी हाती घेतलेल्या मोहीमेत लष्करे तैबा, जैशे मोहम्मद, हिजबुल मुजाहिदीन आणि अन्सार गजकत-उल-हिंद या संघटनांचे प्रमुख दहशतवादी ठार झाले.

आपली प्रतिक्रिया द्या