जम्मू-कश्मीर संदर्भात अजित डोवाल आणि अमित शहांमध्ये महत्वाची बैठक

2288
ajit-doval

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जम्मू-कश्मीरमधील वातावरण हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. सोमवारी कश्मीर खोऱ्यातील शाळा-कॉलेज पुन्हा एका सुरू करण्यात आले आहेत. दोन आठवड्यानंतर शाळा-कॉलेज सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची संख्या कमी असली तरी दैनंदिन कामे सुरळीत पार पडत आहेत. वातावरणातील तणाव निवळत असल्याने श्रीनगरमध्ये लँडलाईन दूरध्वनी सेवा सुरू करण्यात येत आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज जम्मू-कश्मीरसंदर्भात एक महत्वाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीसाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल देखील उपस्थित झाले आहेत.

कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-कश्मीरमध्ये कलम 144 लागू करून जमाव बंदी करण्यात आली. अफवा पसरू नये या करता इंटरनेट आणि दूरध्वनी सेवा देखील बंद ठेवण्यात आल्या. रविवारी सकाळी 2 जी इंटरनेट सेवा बहाल करण्यात आली होती. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव दुपारनंतर पुन्हा एकदा ही सेवा बंद करण्यात आली. कलम 370 हटवल्यापासून अजित डोवाल हे कश्मीर खोऱ्यात ठाण मांडून होते. त्यांनी तिथल्या नागरिकांसोबत जेवण घेतले. त्यांच्याशी चर्चा देखील केली. इथल्या एकूण परिस्थितीची माहिती ते अमित शहा यांना देत आहेत.

जम्मू-कश्मीरसंदर्भातील मुद्दा असंवेदनशील असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने यावर तत्काळ सुनावणी करण्यास नकार दिला होता. सरकारने देखील यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येईल अशी माहिती न्यायालयाला दिली होती. या सर्व पार्श्वभूमीवर जम्मू-कश्मीरमधील स्थितीत कितपत सुधारणा झाली आहे. तणाव कधीपर्यंत निवळेल. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्ती, स्थानबद्ध असलेल्या व्यक्तींसंदर्भात कोणता निर्णय घ्यायचा याची चर्चा या बैठकीत झाल्याची माहिती वृत्तवाहिनींच्या सूत्रांद्वारे देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या