जम्मू–कश्मीर पुन्हा पेटले! चार दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद

599

कश्मीरात पाकडय़ांच्या कुरापती सुरूच आहेत. नवरात्रोत्सवाच्या आदल्या दिवशी अतिरेक्यांनी कश्मीरमधील रामबन, श्रीनगर आणि गंदरबल येथे 12 तासांत 3 हल्ले केले. हिंदुस्थानी सैन्याने या अतिरेक्यांना चोख उत्तर देत त्यांचे हल्ले परतवून लावले. एवढेच नव्हे तर, 4 दहशतवाद्यांचा खात्माही केला. दहशतवाद्यांसोबत झालेल्या या चकमकीत हिंदुस्थानचा एक जवान मात्र शहीद झाला आहे.

साध्या गणवेशात आलेल्या पाच अतिरेक्यांनी शनिवारी रामबनमधील एका घरावर हल्ला चढवत कुटुंबाला ओलीस ठेवले. या घटनेची माहिती मिळताच हिंदुस्थानी सैनिकांनी सीआरपीएफ आणि पोलिसांच्या मदतीने या घराला घेराव घातला आणि अतिरेक्यांच्या तावडीत सापडलेल्या या कुटुंबाची सुटका केली. या चकमकीत पाचपैकी तीन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले.

श्रीनगरमध्ये अतिरेक्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर ग्रेनेड हल्ला केला. सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. गंदरबलमध्ये अतिरेकी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली. त्यानंतर राष्ट्रीय रायफल्स, एसओजी आणि सीआरपीएफच्या जवानांनी शोधमोहीम सुरू केली. त्यावेळी झालेल्या चकमकीत एका अतिरेक्याला ठार करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या