जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पुन्हा चकमक, एका दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू कश्मीरच्या त्रालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पुन्हा एकदा मोठी चकमक उडाली आहे. दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या अंधाधुंद गोळीबाराला सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा झाला आहे. या परिसरात जैश-ए-मोहम्मदचे दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याचीही माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, त्रालच्या नादिर गावात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये अंधाधुंद गोळीबार झाला. पुलवामध्ये गेल्या 48 तासात दुसऱ्यांदा गोळीबाराची घटना घडली आहे. त्यामुळे सुरक्षा दलाचे जवान अलर्ट मोडवर आहेत.

जम्मू-काश्मीर पोलिसांनी गुरुवारी सकाळी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करून चकमकीची माहिती दिली. काश्मीर झोन पोलिसांनी त्यांच्या एक्स हँडलवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हंटले की, त्राल भागातील नादिरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक सुरू आहे. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. ते इतर ठिकाणीही शोध मोहीम राबवत आहेत आणि दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. असे ट्वीटमध्ये म्हंटले आहे.

मंगळवारीच शोपियामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. यामध्ये सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. लश्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर शाहीद कुट्टीचा या दहशतवाद्यांमध्ये समावेश होता. जिनपथेर केलर परिसरात सुरक्षा दलांनी या दहशतवाद्यांना घेरले होते. या ऑपरेशनला ऑपरेशन केलर असे नाव देण्यात आले.

या कारवाईत मारल्या गेलेल्या लष्कर दहशतवाद्यांपैकी एकाचे नाव शाहिद कुट्टे होते, शाहिद हा शोपियानचा रहिवासी होता. 8 मार्च 2023 रोजी लष्करात सामील झाला. दुसऱ्या दहशतवाद्याची ओळख अदनान शफी दार अशी झाली आहे. अदनान शोपियानमधील वंदुना मेल्होरा येथील रहिवासी आहे. 18 ऑक्टोबर 2024 रोजी लष्करात सामील झाला.

जम्मू-कश्मीर अजूनही दहशतीखाली, ‘लश्कर-ए-तोयबा’च्या तीन अतिरेक्यांचा शोपियानमध्ये चकमकीत खात्मा