जम्मू-कश्मीरविरुद्ध सुरू असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील एलिट ‘अ’ गटातील लढतीत महाराष्ट्राचा पहिला डाव संकटात सापडला आहे. सलामीवीर सिद्धेश वीरचे (127) झुंजार शतक आणि कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या (86) अर्धशतकी खेळीनंतरही महाराष्ट्राला 86 षटकांत 6 बाद 312 धावसंख्येपर्यंतच मजल मारता आलीय. महाराष्ट्राचा संघ अजूनही 207 धावांनी पिछाडीवर असून, त्यांचे केवळ 4 फलंदाज शिल्लक आहेत.
जम्मू-कश्मीरने महाराष्ट्राच्या गोलंदाजांना निष्प्रभ ठरवित पहिला डाव 7 बाद 519 धावांवर घोषित केला होता. यात सलामीवीर शुभम कजुरिया (255) व शिवांश शर्मा (नाबाद 106) यांनी सुरेख फलंदाजी केली होती. महाराष्ट्राकडून हिनेश वाळुंजने 4 बळी टिपले, पण इतर गोलंदाजांची त्याला साथ मिळाली नव्हती. प्रत्युत्तरादाखल महाराष्ट्राची सुरुवातही अतिशय वाईट झाली होती.
मुर्तझा ट्रंकवाला याला भोपळाही फोडता आला नाही, तर सचिन धसही 10 धावांवरच माघारी परतला. त्यानंतर सिद्धेश वीर व ऋतुराज गायकवाड यांनी तिसऱ्या विकेटसाठी 175 धावांची भागीदारी करीत महाराष्ट्राला सावरले. मात्र, ऋतुराज बाद झाल्यानंतर पुन्हा पडझड झाल्याने महाराष्ट्राचा डाव संकटात सापडला. अंकित बावणे (26) व निखिल नाईक (21) हे अनुभवी शिलेदार मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अर्शिन कुलकर्णी 19, तर रामकृष्ण घोष 7 धावांवर खेळत होते. उद्या लढतीतील शेवटचा दिवस असून, जम्मू-कश्मीर संघाला पहिल्या डावात आघाडी घेण्याची संधी असले. जम्मू-कश्मीरकडून औकिब नबी व रसिक सालम यांनी 2-2 फलंदाज बाद केले.