बिनविरोधसाठी एवढा अट्टहास का? गिरीश महाजनांसारख्या बेफाम मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा घ्यावा! – रोहित पवार

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 2 डिसेंबर रोजी 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा काल (21 नोव्हेंबर) शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे सत्ताधाऱ्यांनी दडपशाही करत विरोधी उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास भाग पाडल्याचे समोर आले आहे.

जामनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घ्यावी म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी नगरपरिषद कार्यालयामध्ये दादागिरी करत थेट उमेदवाराची कॉलर पकडली. यामुळे मोठा गोंधळ उडाला. याचाच व्हिडीओ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर करत भाजपवर हल्ला चढवला आहे.

भाजपचे तथाकथित संकटमोचक गिरीश महाजन यांच्या जामनेर शहरात दडपशाहीने वंचितसह समविचारी पक्षाच्या उमेदवारांना सत्तेचा गैरवापर करत दडपशाही मार्गाने बळजबरी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला भाग पाडले गेलं, ही आहे बिनविरोध निवडणुकांची वस्तूस्थिती, असे रोहित पवार म्हणाले

बिनविरोधसाठी एवढा अट्टहास का? विकली गेलेली यंत्रणा आणि षंढ असलेला निवडणूक आयोग तर यावर काही बोलणार नाही, पण अशाने लोकशाही अखेरच्या घटका मोजत नाही का? यावर सर्वसामान्य जनतेने मात्र नक्कीच विचार करायला हवा, असेही ते पुढे म्हणाले.

दडपशाही आणि गुंडगिरी करून लोकशाहीची हत्या करू पाहणाऱ्या, लोकशाहीला घातक असणाऱ्या गिरीश महाजन यांच्यासारख्या बेफाम मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा घेऊन, त्यांचे असले चाळे खपवून घेतले जाणार नाहीत असा स्पष्ट संदेश द्यावा, असेही ते एक्स पोस्टमध्ये म्हटले. यासोबत त्यांनी गुंडांना जामीन नेत्यांना जमीन नेत्यांच्या कुटुंबियांना नगरपरिषदांचे इनाम आणि भाजपची बिनविरोध कुटुंब कल्याण योजना, हे हॅशटॅगही वापरले आहेत.

महाजनांची पत्नी बिनविरोध

जामनेर नगरपरिषद निवडणुकीमध्ये मंत्री गिरीश महाजन यांची पत्नी साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी भाजपचे 9 उमेदवार बिनविरोध निवडून आले. यासाठी भाजपने साम-दाम-दंड-भेद याचा वापर केला. दबावतंत्राचा वापर करत उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास भाग पाडल्याचे आता समोर आले आहे.