
जपानमधील आइची येथील टोयोके शहरात नागरिकांना दिवसातून केवळ 2 तास स्मार्टफोन वापरण्याची परवानगी आहे. हा नियम 1 ऑक्टोबरपासून लागू झाला आहे. मुलांसाठीही वेळेची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या निर्णयावर शहरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
स्मार्टफोनच्या अतिवापराला आळा घालण्यासाठी टोयोके महापौरांनी आदेश जारी केला आहे. त्यानुसार नागरिकांना मोबाईल फोन किंवा टॅब्लेटचा वापर दिवसातून 2 तासांपेक्षा जास्त न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. महानगरपालिकेने ई-मेलद्वारे नागरिकांना त्यांच्या आरोग्याची आणि झोपेच्या वेळेची काळजी घेण्यास सांगितले आहे. तसेच स्मार्टफोन किंवा इतर उपकरणांवर घालवलेल्या वेळेऐवजी कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा सल्ला दिला आहे. शिक्षकांना आणि स्थानिक प्रशासनाला पाठवलेल्या दुसऱया ई-मेलमध्ये म्हटले आहे की, हा अध्यादेश जारी करण्याचा मुख्य उद्देश लोकांची झोप पूर्ण व्हावी हा आहे.
लहान मुलांसाठी नियम
नियमानुसार 6 ते 12 वर्षांच्या मुलांना रात्री 9नंतर स्मार्टफोन आणि टॅब्लेट वापरण्याची परवानगी नाही. तर 12 वर्षांवरील लोकांसाठी ही वेळमर्यादा रात्री 10 वाजता निश्चित करण्यात आली आहे.