बुमराहची विकेट पडली, लग्नाच्या तयारीसाठी घेतली सुट्टी; कोण आहे ‘ही’ तरुणी

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने इंग्लंडविरुद्ध उद्या 4 मार्चपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीतून माघार घेतली आहे. बुमराहने वैयक्तीक कारणाचा हवाला देत बीसीसीआयकडे सुट्टी देण्याची मागणी केली होती आणि बीसीसीआयने देखील ही मागणी मान्य केली.

सुट्टी घेण्यामागे नक्की काय कारण आहे याबाबत खुलासा करण्यात आलेले नाही, मात्र बुमराहची विकेट पडली असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. कारण बुमराहसोबतच दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरम (Anupama Parameswaran) हिनेही सुट्टी घेतली आहे. याबाबत तिने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली.

दरम्यान, बुमराह याला दुखापत झाल्यामुळे त्याने सुट्टी घेतली असावी असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र आता यामागे वेगळेच कारण असल्याचे समोर आले आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने बुमराने लग्नाची तयारी करण्यासाठी सुट्टी घेतल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे याच आठवड्यात त्याच्या लग्नाचा बार उडणार असल्याचे बोलले जात आहे. लग्न नक्की कधी, कुठे आणि कोणत्या दिवशी होणार याबाबत अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

याबाबत ‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, बुमराहचे लवकरच दोनाचे चार हात होणार आहेत. त्याने लग्नाची तयारी करण्यासाठी इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या कसोटीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

दरम्यान, अभिनेत्री अनुपमा परमेश्वरम (Anupama Parameswaran) हिने तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे. काही दिवसांपूर्वी अनुपमा आणि बुमराह एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगली होती. याच दरम्यान बुमराहने चौथ्या कसोटीतून सुट्टी घेतली, तर अनुपमा हिनेही मंगळवारी एक पोस्ट शेअर करत सुट्टी घेत असल्याचे सांगितले आणि काहीतरी शिजत असल्याचा अंदाज नेटकऱ्यांना आला.

आपली प्रतिक्रिया द्या