बुमरा नसणे संघासाठी चिंतेची बाब!

jasprit-bumrah

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत जसप्रीत बुमरासारख्या प्रतिभावान गोलंदाजाची अनुपस्थिती ही हिंदुस्थानी संघासाठी नक्कीच चिंतेची बाब आहे. बुमराने गेल्या दोन वर्षांत उत्कृष्ट कामगिरी करून आपली वेगळीच छाप पाडली आहे. तो जगातील इतर वेगवान गोलंदाजांपेक्षा अधिक प्रभावी आणि भेदक ठरला आहे. बुमरा, अश्विन, कुंबळे, झहीरसारख्या मॅचविनर खेळाडूंना दुखापत होते तेव्हा कोणत्याही संघासाठी समस्या निर्माण होऊ शकतात, असे मत हिंदुस्थानचे माजी कर्णधार कपिलदेव यांनी व्यक्त केले. तसेच बुमरा लवकरच पुनरागमन करील, अशी आशाही त्यांनी बोलून दाखवली.

चॅम्पियन्स ट्रॉफी अवघ्या आठवडय़ावर येऊन ठेपलेली असताना दुखापतीमुळे बुमरा संघाबाहेर गेल्याने हिंदुस्थानच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरलेय. 2024 मध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटपटू म्हणून निवडण्यात आलेला बुमरा कंबरदुखीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडल्याने हिंदुस्थानची गोलंदाजी कमकुवत झाली आहे.

कपिलदेव म्हणाले, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी वरुण चक्रवर्तीची निवड नक्कीच फायद्याची ठरेल. चक्रवर्तीमध्ये प्रतिभा असून तो चॅम्पियन्स ट्रॉफीत नक्कीच छाप पाडेल. जेव्हा जेव्हा एखादा गूढ गोलंदाज संघात सामील होतो तेव्हा त्याचा इतर संघावर परिणाम होते, हा इतिहास आहे.