ठसा : ऍडमिरल जयंत नाडकर्णी

स्वातंत्र्यानंतरच्या काळात हिंदुस्थानी लष्कर, वायुदल आणि नौदल या तिन्ही दलांमध्ये अनेक धडाडीच्या सेनाधिकार्‍यांनी कर्तृत्व गाजविले. त्यात महाराष्ट्रातील बरीच नावे घेता येतील. ऍडमिरल जयंत नाडकर्णी (निवृत्त) हे त्यापैकीच एक. हिंदुस्थानी नौदलाचे सक्षम नेतृत्व करणार्‍या जयंत नाडकर्णी यांनी त्यांचे आयुष्य नौदलाच्या उभारणीसाठी घालवले. १९४९ च्या दरम्यान टीएस डफ्रिनमध्ये प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर जयंत नाडकर्णी ‘रॉयल इंडियन नेव्ही’त रुजू झाले. त्यानंतर डार्ट माऊथ या रॉयल नेव्हल कॉलेजमध्ये त्यांनी प्राथमिक प्रशिक्षण घेतले. त्यात प्रामुख्याने रॉयल इंडियन नेव्हीच्या ताफ्यातील युद्धनौकांच्या प्रशिक्षणाचा उल्लेख करावा लागेल. शिवाय नौकानयन आणि दिशादर्शन शास्त्र यामध्येही जयंत नाडकर्णी यांनी प्रावीण्य मिळवले. नंतर ते आयएनएस तलवार आणि आयएनएस दिल्लीचे कमांडिंग ऑफिसर बनले. पुढे पश्चिम क्षेत्राचे फ्लॅग ऑफिसर म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. नौदल उपप्रमुख होण्याआधी त्यांची ईस्टर्न नेव्हल कमांडच्या ‘फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ’ या पदावर नियुक्ती करण्यात आली होती.

१ डिसेंबर १९८७ रोजी त्यांनी नौदलप्रमुख म्हणून कार्यभार संभाळला. १९८७ ते १९९० या कालावधीत त्यांनी हिंदुस्थानी नौदलाचे कार्यक्षम नेतृत्व केले. नौदलप्रमुख या नात्याने हिंदुस्थानसमोरील भविष्यातील सागरी आव्हाने याबाबत नाडकर्णींचा गाढा अभ्यास होता. आता नौदलाच्या आधुनिकीकरणाचे जे वेगवेगळे प्रकल्प आकारास येत आहेत ते त्या काळात सुचविले गेले होते, हे लक्षात घेतले म्हणजे नाडकर्णी आणि त्यांच्या समकक्ष नौदल अधिकार्‍यांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय येतो. युद्ध कार्यवाहीसाठी सज्ज असणारे नौदल तळ, प्रशिक्षण आणि अस्थापना विभाग यांचीही धुरा नाडकर्णी यांनी वाहिली. गोवा मुक्ती संग्राम तसेच १९६५ आणि १९७१ च्या युद्धात त्यांचा सहभाग राहिला. सागरी युद्ध कौशल्य प्राप्त करून नौदलात झोकून दिलेल्या जयंत नाडकर्णी यांना अध्यापनामध्येही प्रचंड रस होता. त्यातून नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संरक्षणशास्त्र महाविद्यालयाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले. नौदल मुख्यालयातही त्यांनी वेगवेगळ्या जबाबदार्‍या सांभाळल्या. हिंदुस्थानी नौदलाच्या एकूण विकासातील त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आणि वेळोवेळी त्यांनी पार पाडलेली कामगिरी याची दखल घेऊन सरकारच्या वतीने त्यांना ‘परम विशिष्ट सेवा पदक’, ‘नौसेना पदक’ आणि ‘विशिष्ट सेवा पदक’ देऊन सन्मान करण्यात आला. आपल्या देशाला काही हजार किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. ‘२६/११’ सारख्या मुंबईवरील भयंकर दहशतवादी हल्ल्यामुळेदेखील आपल्या सागरी सीमांना असलेला धोका आणि त्याची सुरक्षितता या गोष्टी ऐरणीवर आल्या आहेत. या सर्व बाबतीत हिंदुस्थानी नौदलाचे महत्त्व खूप आहे. अशा अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील सैन्य दलाचे नेतृत्व नाडकर्णी यांनी समर्थपणे केले.

जयंत यांचे बंधू ज्ञानेश्वर नाडकर्णी हेदेखील प्रसिद्ध नाट्य समिक्षक आणि अभ्यासक होते. इंग्रजी तसेच मराठी नाटकांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. नाटक, कथासंग्रह, कादंबरी, प्रवास वर्णने, समीक्षा, चरित्र असे साहित्यातील अनेक प्रकार ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनी हाताळले. बालगंधर्व यांचे चरित्र त्यांच्यामुळे इंग्रजीतून जगभरात गेले. हिचकॉक, पिकासो यांच्यावर लिहिलेली त्यांची चरित्रे विशेष गाजली होती. मॉडर्न आर्ट हिंदुस्थानात येण्याच्या आधीपासून कलासमीक्षा करणारे देशात जे मोजके कलासमीक्षक होते त्यात ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचा समावेश होता. जयंत आणि ज्ञानेश्वर या दोन्ही बंधूंनी आपापल्या क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवला. आज दोघेही हयात नाहीत. जयंत नाडकर्णी यांच्या निधनाने हिंदुस्थानी नौदलाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचललेले एक धडाडीचे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.