चंद्रावर जायला 600 कोटी रुपये अन् वसई-विरारला जायला…, जयंत पाटलांची टीका आणि एकच पिकला हशा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली. जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात महायुती सरकारच्या अलिबाग टू वसई-विरार कॉरिडोर प्रकल्पावरही ताशेरे ओढले आहेत.

काय म्हणाले जयंत पाटील?

जयंत पाटील यांनी महायुती सरकारच्या विकासकामांच्या टेंडर प्रक्रियेचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी अलिबाग टू वसई-विरार कॉरिडोर प्रकल्पाच्या टेंडरवरही भाष्य केले. महायुती सरकार अलिबाग ते वसई-विरार असा 96 किलोमीटरचा कॉरिडोर बांधणार आहे. यासाठी अंदाजे 20 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून 26 हजार कोटींचे टेंडर सुरू आहे.

याबाबत बोलताना जयंत पाटील यांनी शेकापच्या जयंत पाटलांना ‘आम्हाला डायरेक्ट वसई-विरारला पोहचायचे आहे, अशी काही मागणी होती का?’ असा प्रश्न केला. पुढे ते म्हणाले की, ‘चंद्र 3 लाख 85 हजार किलोमीटर आहे. नाना पटोलेंना माहिती असेल चंद्र कुठे आहे’, असे म्हणताच एकच हशा पिकला.

चंद्रावर चांद्रयान 3 गेलं त्याला 600 कोटी रुपये खर्च आला. पण जयंत पाटलांच्या वरसोलीवरून भाई ठाकूरांच्या गावाला जायला म्हणजे अलिबाग टू विरार वसईला जायला तीन किलोमीटर जरी गेलात तरी 600 कोटी संपले. एका किलोमीटरचा खर्च फार नाही 273 कोटी रुपये, असे म्हणताच पुन्हा एकदा उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.