राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज भाजपवासी झालेले वाईचे माजी आमदार मदन भोसले यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, महायुतीत अस्वस्थता निर्माण झाली आहे.
माजी आमदार मदन भोसले हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी खासदार प्रतापराव भोसले यांचे चिरंजीव असून, किसन वीर सातारा साखर कारखान्याचे दीर्घकाळ अध्यक्ष होते. कारखाना अडचणीत आल्याने तत्कालीन फडणवीस सरकारकडून मदत होईल, या अपेक्षेने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्यांचा भ्रमनिरास झाला. निवडणुकीत कारखाना हातून गेला आणि विधानसभेतही पराभव झाला. आता अजित पवार गट महायुतीसोबत असल्याने व विद्यमान आमदार मकरंद पाटील हे अजित पवार यांच्याकडे असल्यामुळे आपल्या उमेदवारीविषयी मदन भोसले चिंतेत आहेत.
आज सकाळी जयंत पाटील यांनी मदन भोसले यांच्या सातारा येथील निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी असलेल्या मदन भोसले यांच्या कन्या सुरभी भोसले उपस्थित होत्या. या भेटीबद्दल दोन्ही नेत्यांनी ताकास तूर लागू दिली नाही. तासाभरानंतर मदन भोसले यांच्या घरातून बाहेर पडताना दोघांच्याही चेहऱयावर स्मितहास्य होते. सध्याच्या भेटीगाठींविषयी विचारले असता, ‘सगळे माझे मित्र आहेत’, असे मिश्किल उत्तर जयंत पाटील यांनी दिले.