
राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आपण गृहमंत्रीपद का नाकारले त्याचा एक किस्सा आज सांगितला. गृहमंत्री पदाबाबत आपल्याला विचारणा केली तेव्हा गृहखाते कसे आहे, अशी विचारणा मी आर. आर. पाटील यांच्याकडे केली. त्यावर तुम्हाला रक्तदाब व मधुमेह आहे का, असा प्रश्न आर. आर. पाटील यांनी केला. मी नाही सांगताच गृहखाते घ्या, मग तुम्हाला रक्तदाब, मधुमेह जडेल असा सल्ला दिल्याची आठवण जयंत पाटील यांनी सांगितली.
सांगलीमधील विश्रामबागेत नव्याने झालेल्या पोलीस मुख्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्यांनी पूर्वीची एक आठवण सांगितली. जयंत पाटील यांच्या गृहमंत्री पदाबाबतचा किस्सा मध्यंतरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सांगितला होता. त्याचा संदर्भ देताना जयंत पाटील म्हणाले की, मी गृहमंत्री होण्याच्या आधी आमदार अनिल बाबर यांच्या सोबत एका लग्नसोहळ्यात होतो. यावेळी आर. आर. पाटीलही होते. 2009मध्ये त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळेस पक्षाने मला गृहमंत्री पदाची जबाबदारी घ्यायला सांगितली होती. त्यामुळे मी आर. आर. पाटील यांना गृह खाते कसे आहे, असे विचारले तेव्हा गृह खात्याची जबाबदारी घेतल्यावर मधुमेह व रक्तदाब जडेल असे आर. आर. पाटील यांनी सांगितल्याची आठवण जयंत पाटील यांनी सांगितली.
पोलिसांचा तणाव दूर करण्याची गरज
गृहमंत्री पदाचे काम तणावाचे असते. त्या काळात मला आणि माझ्या दोन्ही खासगी सचिवांनाही रक्तदाबाचा त्रास सुरू झाला. मंत्र्यांवर इतका तणाव असेल तर पोलीस किती तणावात असतील याचा आपण विचार केला पाहिजे. त्यांचा तणाव दूर करण्यासाठी त्यांना तीन-चार दिवस फिरण्याची सुट्टी द्या, अशी सूचनाही जयंत पाटील यांनी यावेळी केली.
राजकीय नेत्यांकडून दमबाजी
गेल्या काही वर्षांमध्ये पोलिसांना राजकीय नेते व कार्यकर्त्यांकडून दमबाजी करण्याचे व धमकी देण्याचे प्रकार वाढले आहेत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.





























































