मुख्यमंत्री महोदय आणि गृहमंत्री महोदयांना झोप तरी कशी लागते? जयंत पाटील यांचा खरमरीत सवाल

पुण्यातील खराडी भागातील एका नदीत तरुणीच्या शरीराचे तुकडे करून फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आले आहे. या महिलेचे डोके, हातपाय कापून नदीपात्रात फेकलं आहे. या घटनेने पुण्यासंह संपूर्ण महाराष्ट्राचा थरकाप उडवला आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न तसेच एकंदरीत राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना फटकारले आहे. ”पुण्यात तरुणीच्या निर्घृण हत्येची बातमी म्हणजे विकृतीचा कळस आहे. खराडी येथील नदीपात्रात तरुणीचे धड आढळले आहे. इतका क्रूर गुन्हा करण्याची गुन्हेगाराची मजल जातेय याला कारणीभूत झोपलेले गृहखातं आणि निष्क्रिय सरकार आहे. महाराष्ट्रात आज महिला वर्गासह जनसामान्य मोठ्या भीतीच्या वातावरणात जगत आहेत. माझा प्रश्न आहे मुख्यमंत्री महोदय आणि गृहमंत्री महोदयांना झोप तरी कशी लागते? महायुती सरकारच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहेत”, अशी पोस्ट शेअर करत जयंत पाटील यांनी राज्य सरकारला फटकारले आहे.