फुटीर आमदार म्हणतात, कुठून अवदसा आठवली अन् यांच्या नादाला लागलो, जयंत पाटील यांचा शिंदे-फडणवीसांना टोला

शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या आमदारांना आता धास्ती वाटतेय. कुठून ही अवदसा आठवली अन् या नादाला लागलो, असे चाळीस फुटीर आमदार म्हणत आहेत, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीसांना लगावला.

शिंदे गट आणि भाजपात प्रत्येकाला मंत्री व्हायचे आहे, काही ना काही पाहिजे आहे, यामुळे पालकमंत्री नेमले जात नाहीत, विस्तार केला जात नाही. मोठय़ा प्रमाणात नाराजी आहे. फुटीरांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे, यामुळे सरकार अस्थिर असून, ते फार काळ टिकणार नाही, असे पाटील नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत म्हणाले.

राष्ट्रवादीच्या भीतीने सत्ताधाऱयांना ग्रासल्याने ते शिवसेनेतील फुटीचे खापर राष्ट्रवादीवर पह्डत आहेत. महाविकास आघाडीची एकजूट आणि जनमतामुळे भाजपाचा आकडा विधानसभेत 103 वरून ऐंशीच्या खाली जाण्याची शक्यता असल्याने आम्ही दोनशे जागा जिंकणार असा भ्रम भाजप आणि शिंदे गट निर्माण करत असल्याचे ते म्हणाले.

आदित्य ठाकरेंच्या दौऱयामुळे फुटीरांना धास्ती

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या राज्यभरातील दौऱयांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यामुळे विरोधकांच्या विशेषतः फुटीर आमदारांना धास्ती वाटतेय. पुढील निवडणुकीत निवडून येणे अशक्य आहे, याची खात्री झाल्याने आम्ही परत आलो तर चालेल का, असे हे फुटीर आमदार खासगीत विचारणा करीत असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.