
जिल्ह्यात पुराचे पाणी संथ गतीने ओसरू लागले आहे. तरीही नदीकाठच्या गावांमध्ये अजूनही पूरस्थिती कायम आहे. ज्या गावांमध्ये पूरस्थिती आहे, अशा गावांना सर्वतोपरी सुविधा उपलब्ध करून देण्यास प्रशासन सज्ज असल्याचे सांगून पालकमंत्री जयंत पाटील यांनी पूरग्रस्त भागांमध्ये निर्माण होणाऱया आरोग्याच्या समस्यांसह इतरही समस्या निवारणासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही सुरू करावी, अशी सूचना दिली.
पालकमंत्री जयंत पाटील यांनी मिरज तालुक्यातील कवठेपिरान, सावळवाडी, माळवाडी या भागांचा पूरस्थिती पाहणी दौरा केला. यावेळी कवठेपिरान येथे उपसरपंच भीमराव माने, सचिन पाटील, तर साळववाडी येथे सरपंच राजेंद्र उपाध्ये, उपसरपंच राहुल माणगावे, तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
कवठेपिरान येथे पालकमंत्री जयंत पाटील यांनी ‘हिंदकेसरी’ मारुती माने यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मारकास अभिवादन केले. गावातील पूरस्थितीची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे उपसरपंच भीमराव माने यांनी डेंग्यू, चिकुनगुनियासारखे रोग आले असून, स्वच्छतेसाठी आम्हास मोठे फॉग मशीन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली.
पालकमंत्री जयंत पाटील यांनी पाण्याने वेढलेली सावळवाडी व माळवाडी गावांना दुचाकीवरून भेट देऊन पूरग्रस्तांच्या समस्या ऐकून घेतल्या. महापुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना शासनाने तत्काळ 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ व 5 किलो तूरडाळ मोफत देण्याचे जाहीर केले आहे. त्याला अनुसरून पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते आज या धान्याचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये बाळगोंडा पासगोंडा पाटील, शालन बनगोंडा पाटील, बाबासाहेब गबरू आवटी, त्रिशला भाऊसाहेब पाचोरे, माणिकचंद्र गबरू आवटी यांना हे वाटप पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करून सांगली जिल्ह्यामध्ये शासनाच्या मदतवाटपास सुरुवात करण्यात आली.




























































