जयदीप आपटे कुठे आहे? गायब केला की फरार झाला! संघ कनेक्शनमुळे व्हाया नागपूर दिल्लीहून निघाली कामाची ‘ऑर्डर’

मालवणच्या राजकोट येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय शिल्पकारांना डावलून कल्याणचा नवखा शिल्पकार जयदीप – आपटे याला काम देण्यात आले. मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी असलेल्या मैत्रीसोबतच त्याचे रा. स्व. संघाशी असलेले दृढ कनेक्शनही समोर आले आहे. आपटेचे वडील आरएसएसचे कट्टर कार्यकर्ते होते. यामुळेच दिल्लीहून व्हाया नागपूरमुळे जयदीपला कामाची ऑर्डर देण्याचे आदेश आल्याची कल्याणमध्ये उघड चर्चा आहे. तकलादू कामामुळे न अवघ्या आठ महिन्यांत शिवरायांचा पुतळा कोसळला आणि जयदीप फरार झाला. मात्र भ्रष्ट कामातील ‘कनेक्शन’ उघड होऊ नये यासाठी तो नक्की फरार झाला की त्याला गायब केल्याची भीती जयदीपच्या निकटवर्तीय शिल्पकार मित्रांनी व्यक्त केली आहे. आपटेच्या घराला आणि कारखान्याला कुलूप असल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण मिळत आहे.

  • मोठे पुतळे बनवण्याचा कोणताही अनुभव नसताना जयदीपला केवळ श्रीकांत शिंदे यांच्या आग्रहामुळे काम दिल्याचा आरोप आहे.
  • जयदीपने राजकोट येथील शिवरायांचे 28 फूट उंच शिल्प घडवण्याआधी फक्त तीन ते ने पाच फुटांचे पुतळे बनवले होते. त्यामुळे तगडे पोलिटिकल कनेक्शन असल्याशिवाय शिवरायांचा व पुतळा उभारण्याचे काम जयदीपला मिळाले नाही.
  • आधी श्रीकांत शिंदे आणि आता दिल्ली कनेक्शन समोर येत असल्याने या प्रकरणात पापाचे धनी कोण आहे हे हे समोर आलेच पाहिजे, असा संताप शिवप्रेमींचा आहे.
  • जयदीपच्या कल्याण येथील घराला कुलूप आहे. गुप्ते चौकातील कारखानाही बंद आहे. त्याची पत्नी आणि लहान मुलगा कुठे आहे हे शेजारी, नातेवाईकांनाही माहीत नाही.

फक्त धूळफेक

पुतळा कोसळल्यानंतर जयदीप तातडीने मालवणला रवाना झाला होता. नेमकी घटना कशामुळे घडली याबाबत घटनास्थळी पोहोचून मी तुमच्याशी बोलेन असे त्याने सोमवारी प्रसारमाध्यमांना सांगितले होते. मात्र त्याच दिवशी दुपारनंतर त्याचा फोन स्विच ऑफ झाला. पोलिसांना जर त्याला पकडायचेच होते तर तातडीने कारवाई का केली नाही, असा सवाल शिवप्रेमींचा आहे. तो गायब झाला की त्याला पळून जाण्याच्या कोणी सूचना दिल्या याचा तपास झाला पाहिजे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. जयदीप राजकोट किल्ल्यावर येऊन गेला का, याबाबतही बांधकाम खात्याचे अधिकारी, पोलीस काहीच बोलत नाहीत.

मालवण क्राइम ब्रँचचे पोलीस आपटेच्या घरी धडकले

राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच जयदीप आपटे कुटुंबासह फरार आहे. त्याच्या शोधासाठी सिंधुदुर्ग गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस कल्याणमधील जयदीपच्या घरी आज धडकले. मात्र घराला कुलूप असल्याने पोलीस माघारी परतले. तत्पूर्वी पोलिसांनी शेजाऱ्यांकडून तसेच त्याच्या नातेवाईकांकडून जयदीप कुठे आहे याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. क्राइम ब्रँचसह कल्याणच्या स्थानिक बाजारपेठ पोलिसांनीही जयदीपचा शोध सुरू केला आहे.