जेईई-मेन परीक्षेत गेल्या वर्षीचे 56 टॉपर्स बनले डमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मागील वर्षी जेईई परीक्षेत टॉपर्स ठरलेले 56 विद्यार्थी यंदा दुसऱया विद्यार्थ्यांचे डमी बनून परीक्षेला बसले आहेत. विद्यार्थ्यांच्या चेहऱयांची ओळख पटवण्यासाठी राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्राचा वापर केला. त्यात या 56 विद्यार्थ्यांचे चेहरे हे मागील वर्षीच्या टॉपर्सच्या चेहऱयांशी मिळतेजुळते आढळले आहेत. त्यांची माहिती सर्व परीक्षा केंद्रांना देण्यात आली असून हे विद्यार्थी आढळल्यास त्यांना परीक्षेला बसू देऊ नये असे निर्देश एनटीएने दिले आहेत.

2019 आणि 2020 मध्ये झालेल्या जेईई-मेन परीक्षेत सुमारे वीस हजार  विद्यार्थी टॉपर्स ठरले होते. त्यातीलच काही विद्यार्थी यंदा जेईई-मेन परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या जागी परीक्षा देण्यासाठी डमी बनले असावेत असे एनटीएचे म्हटले आहे. परीक्षेला नोंदणी करणार्या विद्यार्थ्यांची छायाचित्रे ही मागील वर्षीच्या टॉपर्सशी मिळतीजुळती आहेत का याची चाचपणी केली गेली होती.

मागील वर्षीचे विद्यार्थी जेईई परीक्षेला पुन्हा बसले असू शकतात पण अशा विद्यार्थ्यांची माहिती त्यावेळी त्यांनी दिल्याप्रमाणेच असायला हवी. मात्र आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्याने ज्या 56 विद्यार्थ्यांबद्दल संशय निर्माण झाला आहे त्यांची छायाचित्रे मागील वर्षीच्या टॉपर्सशी मिळतीजुळती आहेत, परंतु त्यांचे नाव, जन्मतारीख आणि वडिलांचे नाव वेगळे आहे. यावरून ते कदाचित दुसऱया विद्यार्थ्यांचे ‘डमी’ म्हणूनही परीक्षेला बसले असू शकतात असे एनटीएच्या अधिकाऱयांनी सांगितले.

संशयित 56 डमी विद्यार्थ्यांची माहिती प्रत्येक परीक्षा केंद्राला पाठवली गेली आहे. ते परीक्षा केंद्रावर आढळल्यास त्याची माहिती पुढील चौकशीसाठी तातडीने एनटीएच्या मुख्यालयाला कळवण्यात यावी असे निर्देश एनटीएने दिले आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अल्गोरिदम या अद्ययावत तंत्राचा वापर यंदा पहिल्यांदाच जेईई परीक्षेसाठी केला गेला. या वर्षीपासून जेईई-मेन परीक्षा चार वेळा घेतली जाणार असून त्याचे पहिले सत्र सुरू आहे.