जेईई मेन परीक्षेत सिंधुसुपुत्राचा देशात डंका, कुडाळचा स्वयम चुबे देशात पहिला

अबकड

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मूळ कुडाळ तालुक्यातील केरवडे तर्फ माणगांव (भोईचे केरवडे) येथील स्वयम शशांक चुबे याने जानेवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या अखिल भारतीय जेईई मेन परीक्षेत (आयआयटी प्रवेश पूर्व परीक्षा) खुल्या गटात देशात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे तसेच जेईई अॅडव्हान्स परीक्षेतही तो आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. स्वयमने मिळवलेले यश उल्लेखनीय असेच आहे.

या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात या सिंधुदुर्गच्या सुपुत्राने या परीक्षेत राष्ट्रीय स्तरावर देदिप्यमान यश संपादन केले आहे. स्वयमचे आजोबा सुरेश चुबे मुंबई महानगरपालिकेत महापौरांचे सचिव म्हणून कार्यरत होते. सध्या मुंबईत वास्तव्य असलेल्या स्वयमचे शिक्षण मुंबईत झाले. त्याने दहावीत बालमोहन विद्यामंदिरमधून (दादर) 94 टक्के तर नारायणा कॉलेज (अंधेरी) मधून बारावीत 93 टक्के गुण मिळवले.

आयआयटी ही जागतिक दर्जाची संस्था असून यात प्रवेश मिळणे कठिण असते. ठराविक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. परेल-मुंबई येथील डॉ. शशांक चुबे व दादर – मुंबई येथील डेंटिस्ट क्लिनिकच्या डॉ. नैना चुबे यांचा तो मुलगा तर कुडाळ येथील बालरोगतज्ञ डॉ. अमोघ चुबे यांचा तो पुतण्या होय. स्वयंमच्या या यशाबद्दल केरवडे ग्रामस्थ तसेच सिंधुदुर्ग जिल्हाभरातून त्याचे अभिनंदन होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या