
अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करणारा जेफ्री एपस्टीन याच्याशी संबंधित फाईल्समधून खळबळजनक माहिती उघड झाल्यानंतर या प्रकरणात जगातील पहिली अटक झाली, ती म्हणजे ब्रिटनचे माजी युवराज ऍण्ड्रय़ू यांची. गुरुवारी त्यांना ब्रिटनच्या पोलिसांनी अटक केल्यानंतर जवळपास 11 तासांनंतर त्यांना हिंदुस्थानी वेळेनुसार, शुक्रवारी रात्री 1.15 वाजता सोडण्यात आले, मात्र त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या ‘रॉयल लॉज’ या शाही निवासस्थानाची झडती घेतली. सलग दुसऱ्या दिवशीही पोलिसांनी या ठिकाणी शोधमोहीम राबवली. सोमवारपर्यंत ही मोहीम सुरू राहण्याची शक्यता आहे. ऍण्ड्रय़ू यांना अटक कल्याबद्दल पीडित व्हर्जिनिया गिफ्रे हिच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला आहे.
ऍण्ड्रय़ू हे ब्रिटनचे राजे चार्ल्स यांचे लहान बंधू आहेत, मात्र एपस्टीन प्रकरणात नाव समोर आल्यानंतर ऍण्ड्रय़ू यांचे सर्व शाही किताब काढून घेण्यात आले होते. व्हर्जिनिया गिफ्रे या पीडितेने ऍण्ड्रय़ू यांच्यावर वर्ष 2001 मध्ये ती 17 वर्षांची असताना शोषण केल्याचा आरोप केला होता. त्यावेळी ऍण्ड्रय़ू हे ब्रिटनचे वाणिज्य दूत होते. पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. अटक केल्यानंतर त्यांची पोलिसांनी 11 तास चौकशी केली. त्यानंतर त्यांना तपासाच्या अधीन राहून सोडण्यात आले. सुटकेनंतर ते सँड्रिंघम इस्टेट येथील निवासस्थानी गेले. पोलिसांनी या ठिकाणी झडती घेतली. याशिवाय रॉयल लॉज येथे पोलिसांनी बराच काळ शोधमोहीम राबवली. विंडसर कॅसलच्या जवळ 30 खोल्या असलेले हे निवासस्थान आहे. ऍण्ड्रय़ू यांच्या सोबतचे तत्कालीन तैनात असलेल्या सुरक्षा अधिकाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. ऍण्ड्रय़ू यांना अटक करण्यासंदर्भात राज परिवाराला कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती.
तिची मेहनत वाया गेली नाही
ऍण्ड्रय़ू यांच्यावर आरोप करणारी व्हर्जिनिया हिने गेल्या वर्षी आत्महत्या केली. ऍण्ड्रय़ू यांच्याविरोधात सुरू असलेला तपास वेगळ्या कारणांसाठी असला तरीही त्याचा व्हर्जिनियाने केलेल्या आरोपांशी संबंध आहे. ऍण्ड्रय़ू यांना अटक झाल्यानंतर आम्हाला अतिशय आनंद झाला आहे. ती जे काही करत होती, ते परिश्रम आणि प्रयत्न वाया गेले नाहीत, अशी भावना व्हर्जिनियाची बहीण अमांडा रॉबर्टस् हिने व्यक्त केली.
चार शतकांमधील पहिली अटक
ब्रिटिश राजघराण्यात गेल्या चार शतकांमधील ही पहिली अटक ठरली आहे. वर्ष 1554मध्ये एलिझाबेथ टय़ुडर हिला महाराणी मेरी पहिली हिने बंडखोरीच्या आरोपांवरून अटक केली होती. एलिझाबेथनंतर महाराणी एलिझाबेथ पहिली बनली आणि राज्यकारभार सांभाळला. याशिवाय यापूर्वी किंग चार्ल्स पहिले यांना चार शतकांपूर्वी नजरकैदेत ठेवण्यात आले होते. त्यानंतर ब्रिटनमध्ये नागरी युद्ध भडकले होते. चार्ल्स यांचा शिरच्छेद केल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात राजेशाही संपुष्टात आली होती.























































