साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीतील पारंपरिक मर्दानी दसरा सोहळ्याची तब्बल 18 तासांनी सांगता झाली.
शनिवारी सायंकाळी खंडोबा गडावर मुख्य इनामदार राजाभाऊ पेशवे व सचिन पेशवे यांनी हुकूम देताच खांदेकऱ्यांनी पालखी उचलून खांद्यावर घेतली, यावेळी हजारो भाविकांनी भंडारा- खोबऱ्याची प्रचंड उधळण केल्याने सारा खंडोबागड पिवळा धमक झाला. पालखीत खखंडोबा म्हाळसादेवीच्या उत्सवमूर्ती ठेवून पालखी खंडोबागडाला वळसा मारून डोंगरदरीत असलेल्या रमणा या ठिकाणी नेण्यात आली.
तर रात्री कडेपठारच्या डोंगरातील मूळ ठिकाणी असलेल्या खंडोबा मंदिरातील पालखी भेटाभेट सोहळ्यासाठी निघाली. सनई, ढोल, कर्णा, शंख, डमरू, संबळ, टमकी अशी पारंपरिक वाद्ये वाजवीत, फटाक्यांची आतषबाजी करत पालखी पुढे नेण्यात आली, डोंगरातील सुसरशिंगी या अवघड उंचवट्यावर मानवी साखळी करून पालखीला वर ओढावे लागले. त्यानंतर पालखी भेटाभेटीच्या ओट्यावर आणून ठेवण्यात आली. हजारो भाविक दरीमध्ये उतरले. दरीतील पालखीसमोर खंडोबा देवस्थानतर्फे शोभेचे दारूकाम करून उजेड करण्यात आला. मध्यरात्री दोन वाजता मानकरी राऊत यांनी दोन्ही पालख्यांतील आरशामध्ये देव भेट झाल्याचे जाहीर केले. संतोष खोमणे व गणेश निकुडे यांनी भाविकांसाठी नाश्ता व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. पालखी खंडोबागडाच्या पायथ्याशी आली. तेथे धनगर भक्तांनी पालखीवर मेंढ्याची लोकर उधळून सुंबरान मांडले.
खंडा उचलणे स्पर्धेत अनेक तरुणांनी सहभाग घेतला. ही तलवार एक मण (40 किलो) वजनाची आहे. एका हातात खंडा (तलवार) उचलण्याच्या स्पर्धेत अंकुश गोडसे प्रथम आला. त्याने 9 मिनिटे 37 सेकंद खंडा उचलून धरला, तर खंडा कसरतीमध्ये शिवाजी राणे याचा प्रथम क्रमांक आला, या दोघांनाही देवस्थानच्या वतीने प्रत्येकी 35 हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह देण्यात आले.
स्पर्धेच्या वेळी श्री मार्तंड देवसंस्थानचे अध्यक्ष अनिल सौंदाडे, विश्वस्त अॅड. पांडुरंग थोरवे, अभिजित देवकाते, मंगेश घोणे, डॉ. राजेंद्र खेडेकर, अॅड. विश्वास पानसे, पोपट खोमणे आदी उपस्थित होते.
खंडा उचलणे स्पर्धेत मंगेश चव्हाण (द्वितीय), अमोल खोमणे, हेमंत माने, सुहास खोमणे, विजय राऊत, सौरभ सकट, बाबा माने, तर खंडा कसरत स्पर्धेत शिवाजी राणे (प्रथम), नितीन कुदळे (द्वितीय), सचिन कुदळे, विशाल माने, शुभम कुदळे, विजय राऊत, अक्षय गोडसे, आदेश कांबळे हे विजेते ठरले.
पारंपरिक दसऱ्यामध्ये कलावंतांची हजेरी
■ जेजुरी ही कलावंतांची नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. गडावर दररोज सनई-चौघडा वादनाचे काम येथील पारंपरिक कलावंत करत असतात. जेजुरीतील घडशी व वीर समाजातील सुमारे १०० कलावंतांनी संपूर्ण पालखी सोहळ्यामध्ये सनई, चौघडा, ढोल वाजवीत देवासमोर हजेरी लावली. जेजुरीतील अनेक कलावंत राज्याच्या विविध भागात सनई-चौघडा वाजवण्याचे काम करतात. ते सर्व आवर्जून दसरा सोहळ्यासाठी जेजुरीत येतात.
डोंगरात सर्वत्र लाईट बसविल्याने भाविकांची सोय
■ कडेपठारच्या डोंगरात मध्यरात्री खंडोबा देवांचा भेटाभेट सोहळा होत असल्याने त्या ठिकाणी सर्वत्र ट्यूबलाईट बसविण्यात आल्या होत्या. उजेड भरपूर असल्याने पालखी सोहळ्यामध्ये चालताना भाविकांना त्रास जाणवला नाही. पूर्वी हवाई नळे पेटवून त्याच्या उजेडातच पालखी सोहळा पुढे नेला जात असे. येथील राऊत परिवारातर्फे परंपरेने पालखीसमोर हवाई नळे उडवण्याचे काम केले जाते. जेजुरीचा दसरा हा प्रामुख्याने डोंगरदरीमध्ये होतो. अवजड पालखी नेताना खांदेकऱ्यांचे कसब पणाला लागते, तर खंडा उचलणे स्पर्धा पाहताना साऱ्यांचे श्वास रोखले जातात. यामुळेच या दसऱ्याला ‘मर्दानी दसरा’ असे म्हटले जाते.