राहुल गांधींना मानहानीच्या प्रकरणात झारखंडच्या चाईबासा न्यायालयाकडून जामीन मंजूर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना मानहानीच्या प्रकरणात बुधवारी झारखंडच्या चाईबासा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. हे प्रकरण भाजप नेते प्रताप कटिहार यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याशी संबंधित आहे. हा संपूर्ण वाद राहुल गांधी यांनी 28 मार्च 2018 रोजी काँग्रेस अधिवेशनात दिलेल्या एका विधानाने सुरू झाला. राहुल गांधी यांनी तत्कालीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याबाबत विधान केले होते. यासंदर्भात प्रताप कटिहार यांनी 9 जुलै 2018 रोजी चाईबासा सीजेएम न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला.

या प्रकरणात अनेक वेळा समन्स पाठवण्यात आले होते, परंतु राहुल गांधी न्यायालयात हजर राहिले नाहीत. अखेर 26 जून रोजी न्यायालयाने त्यांच्या उपस्थितीसाठी अजामीनपात्र वॉरंट जारी केले. राहुल गांधींनी याविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. हा खटला प्रथम चाईबासा सीजेएम कोर्टातून रांची एमपी-एमएलए स्पेशल कोर्टात हस्तांतरित करण्यात आला, परंतु नंतर चाईबासा येथे एमपी-एमएलए स्पेशल कोर्ट स्थापन झाल्यावर हा खटला पुन्हा चाईबासा येथे हलवण्यात आला.आता त्यांना या प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे.