
झारखंडमध्ये गाजत असलेल्या मद्य घोटाळय़ाचे धागेदोरे महाराष्ट्रातील 108 अॅम्ब्युलन्स घोटाळय़ापर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. या घोटाळय़ात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुमित फॅसिलिटी कंपनीचा संचालक अमित साळुंखेला अटक केले आहे. या अमित साळुंखेचे श्रीकांत शिंदे फाऊंडेशनशी कनेक्शन असल्याने कामाचा कोणताही अनुभव नसताना त्याच्या सुमित फॅसिलिटीला 108 नंबर अॅम्ब्युलन्सचे कंत्राट देण्यात आले.
गोरगरीब आणि गरजू रुग्णांसाठी आधार ठरलेल्या सरकारी 108 क्रमांकाच्या सरकारी अॅम्ब्युलन्सचे आधीचे पंत्राट रद्द करून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात नव्याने टेंडर काढण्यात आले. ही निविदा दुपटीने फुगविण्यात आली. हे टेंडर केवळ आठ दिवसांत निश्चित केले गेले. तीन वर्षांसाठी सरकारी कामाचे टेंडर असताना त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी टेंडर काढण्यात आले. एका स्पॅनिश कंपनीला पुढे करून पिंपरी-चिंचवडमधील अमित साळुंखेच्या सुमित फॅसिलिटी कंपनीला हे काम देण्यात आले. साळुंखे हे श्रीकांत शिंदे यांच्या जवळचे असल्याने तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मध्यस्थीने हे काम सुमित फॅसिलिटीला देण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.