
सुपर लीगमधील अखेरच्या सामन्यात आंध्र प्रदेशकडून 9 विकेट्सने पराभव पत्करावा लागला असला तरी झारखंडने नेट रनरेटच्या जोरावर सय्यद मुश्ताक अली करंडकाच्या अंतिम फेरीत प्रथमच धडक मारली. ईशान किशनच्या नेतृत्वाखाली झारखंडने ‘ब’ गटात सरस नेट रनरेट राखत अव्वल स्थान पटकावले. आता अंतिम फेरीत हरयाणा विरुद्ध झारखंड असे द्वंद्व रंगेल. दुसरीकडे, हरयाणाने हैदराबादवर 124 धावांनी दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीचे तिकीट निश्चित केले. फलंदाजांसाठी पोषक खेळपट्टीवर हरयाणाचा कर्णधार अंकित कुमार (57) आणि समंत जाखर (60) यांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर 6 बाद 246 धावांचा डोंगर उभा राहिला. प्रत्युत्तरात अमित राणा (3/14) आणि ईशांत भारद्वाज यांच्या भेदक गोलंदाजीसमोर हैदराबाद 122 धावांत गारद झाला. झारखंड-आंध्र सामन्यात विराट सिंग (77) आणि ईशान किशन यांची सलामी जोडी चमकली.

























































