वीरमाता जिजाबाई भोसले मार्गावरील नवीन उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

वीरमाता जिजाबाई भोसले मार्गावरील नवीन उड्डाणपुलाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार राहुल शेवाळे,आयुक्त इक्बालसिंह चहल, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक उपस्थित होते

नवीन उड्डाणपुलाची ठळक वैशिष्ट्ये –

घाटकोपर-मानखुर्द जोडरस्ता हा शीव (सायन) – पनवेल महामार्ग आणि पूर्व द्रुतगती मार्ग या दोहोंना जोडणारा मुख्य रस्ता आहे.
या रस्त्यावर पूर्व द्रुतगती मार्ग, सांताक्रुज-चेंबूर जोडरस्ता तसेच पूर्व मुक्त मार्गावरुन येणाऱया वाहनांमुळे नेहमी वाहतूक कोंडीचा अनुभव येत होता.
त्यावर उपाय म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने हा सुमारे 3 किलोमीटर लांबीचा नवीन उड्डाणपूल बांधण्यात आला आहे.
सदर उड्डाणपूल हा शिवाजी नगर, बैंगनवाडी, देवनार क्षेपणभूमी व मोहिते पाटील नगर हे चार महत्त्वाचे जंक्शन त्यासोबत देवनार नाला, चिल्ड्रेन एड नाला, पी. एम. जी. पी. नाला अशा 3 मोठ्या नाल्यांवरुन जातो.
या पुलाची एकूण लांबी 2.991 किलोमीटर तर रुंदी 24.2 मीटर इतकी आहे.
उत्तर वाहिनी 3 व दक्षिण वाहिनी 3 अशा एकूण 6 मार्गिका या पुलावर आहेत.
या उड्डाणपुलाचे बांधकाम खंडजोड (सेगमेंट) तंत्रज्ञानाने व एकल स्तंभ पद्धतीने केलेले असल्याने पुलाखालील रस्त्याच्या मार्गिका देखील वाहतुकीसाठी वापरात आल्या आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत या उड्डाणपुलासाठी प्रथमतःच अखंड पद्धतीने 24.2 मीटर लांबीचा सेगमेंट तयार करण्याचे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.
या पुलाच्या निर्मितीसाठी लागलेल्या साहित्याचा विचार करता एकूण 1 लाख 02 हजार 225 घनमीटर काँक्रिट, 17 हजार 175 मेट्रिक टन लोखंड (रेनफोर्समेंट स्टील), 4 हजार 486 मेट्रिक टन संरचनात्मक लोखंड (स्ट्रक्चरल स्टील), 1 हजार मेट्रिक टन एच.टी. स्ट्रॅण्ड, 586 नग बेअरिंग्स आणि 10 हजार 36 मेट्रिक टन डांबर मिश्रण वापरात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या