‘जिवाची होतिया काहिली’ मालिकेत राज हंचनाळेची विशेष भूमिका

सोनी मराठी वाहिनी सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात व्यस्त आहे. सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘जिवाची होतिया काहिली’ या प्रेमकहाणीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. मराठी आणि कानडी भाषिक प्रेमाची कहाणी छोट्या पडद्यावर दिसत आहे. प्रमुख नायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांचा लाडका, कोल्हापूरचा रांगडा गडी अभिनेता राज हंचनाळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतोय.

नवरात्रीनिमित्त मालिकेत विशेष यक्षगणचे चित्रीकरण सुरु असून त्यात राजची विशेष भूमिका पाहणे साऱ्या रसिक प्रेक्षकांना रंजक ठरणार आहे. विशेष म्हणजे राज या विशेष भागादरम्यान रावणाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. मालिकांमध्ये मुख्य नायक त्याच्या रोजच्या भूमिकेहून एक वेगळी भूमिका साकारतोय असे सहसा होत नाही आणि हे जिवाची होतिया काहिली मालिकेदरम्यान पाहायला मिळणार आहे. राजला म्हणजे अर्जुनला रावणाच्या भूमिकेत पाहायला प्रेक्षकांना नक्कीच भावेल.

राजने साकारलेल्या त्याच्या या आगळ्यावेगळ्या भूमिकेबद्दल तो असे म्हणाला की, “टेलिव्हिजनच्या माध्यमातून यक्षागण ही कर्नाटकातील एक आगळी वेगळी संस्कृती अनुभवायला मिळणार आहे, आणि मी त्याचा भाग आहे यासाठी मी खूप उत्सुक आहे. मालिकेत यक्षागण चे चित्रीकरण सुरू असून मी रावणाची भूमिका साकारतोय, त्यासाठी लागणारा पेहराव, मुकुट परिधान करून चित्रीकरण करणं माझ्यासाठी तारेवरची कसरत आहे, मात्र मी आनंदी आणि उत्सुक असल्याने हे सारं सुरळीत निभावतोय. मेकअपसाठी पण मला 1 तास बसावं लागत आहे. एकूणच या चित्रीकरणाचा अनुभव अविस्मरणीय आहे.” पहा, ‘जिवाची होतिया काहिली’, सोमवार ते शनिवार, संध्या. 7.30वा. सोनी मराठी वाहिनीवर.