कश्मीरात दहशतवाद्यांनी दोन शाळा जाळल्या

321

कलम 370 हटवल्यापासून खवळलेल्या पाकिस्तानने आता निष्पाप शाळकरी मुलांना टार्गेट केले आहे. कश्मीर खोऱयातील जनजीवन पूर्वपदावर येत असताना येथे पुन्हा दहशत माजवण्यासाठी दहशतवाद्यांनी बुधवारी कुलगाम जिह्यातील दोन शाळा पेटवल्या. हे दहशतवाद्यांचेच कारस्थान असल्याचे उघड झाले असून शाळकरी मुले आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

दहशतवाद्यांनी शाळा पेटवल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही आग दहशतवाद्यांनीच लावल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले असून सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याच अनुषंगाने दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे. आठवडाभरापूर्वी एका शाळेजवळ सीआरपीएफच्या पथकाला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. बोर्डाच्या परीक्षा सुरू असताना दहशतवाद्यांनी त्या पथकावर हल्ला केला होता. त्यापाठोपाठ आता शाळा जाळण्याचे प्रकार घडल्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी परिसरातील बंदोबस्त वाढवला आहे.

पोस्टर्सद्वारे स्थानिकांना धमकावल्याप्रकरणी कश्मीरात तिघाजणांना अटक 

हिजबुल मुजाहिदीन आणि लष्कर-ए- तोयबा या दहशतवादी संघटनेची पोस्टर्स वापरून दक्षिण कश्मीरातील अवंतीपोरी येथे स्थानिकांना धमकावल्याप्रकरणी तीन व्यक्तींना बुधवारी अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी दिली. पोलिसांनी तीन व्यक्तींना अटक करून त्यांच्याकडून चिथावणी देणारी पोस्टर्स जप्त केल्याचे अधिकाऱयाने सांगितले. ख्रू अवंतीपोरीमधील लाधू परिसरात त्यांनी धमकावणारी पोस्टर्स प्रसिद्ध करून त्याचे वितरण केले. या आरोपींची अधिक तपासणी करण्यात येत आहे.

तीन वर्षांपूर्वी 35 शाळांना आगी लावल्या होत्या!

तीन वर्षांपूर्वी हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वाणीला ठार मारल्याचा वचपा म्हणून दहशतवाद्यांनी कश्मीर खोऱयातील 35 हून अधिक शाळांना आगी लावल्या होत्या. हिंसाचार आणि तणावाच्या स्थितीमुळे त्यावेळी विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान झाले होते. त्यानंतर आता कलम 370 रद्द केल्याचा राग काढत दहशतवाद्यांनी शाळांना पुन्हा टार्गेट केले आहे.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या