जेएनयूतील अंध विद्यार्थ्यांची पोलीस मुख्यालयाबाहेर निदर्शने

310

 जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील अंध विद्यार्थ्यांनी बुधवारी दिल्ली पोलिसांच्या जुन्या मुख्यालयाबाहेर तीव्र निदर्शने केली. सोमवारी शुल्कवाढीविरोधातील आंदोलनावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा यावेळी निषेध नोंदवण्यात आला. तसेच पोलिसांनी लेखी माफीनामा सादर करावा, अशी मागणीही करण्यात आली.

अंध विद्यार्थी सुरुवातीला नवीन पोलीस मुख्यालयासमोर निदर्शने करणार होते, मात्र त्यांना जयसिंग रोडवर प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. पोलिसांनी आमची बस अडवली आणि आम्हाला वसंत कुंज पोलीस ठाण्यात नेले. नंतर सर्व विद्यार्थ्यांना जुन्या पोलीस मुख्यालयाच्या आवारात आणले, असे अंध विद्यार्थ्यांच्या संघटनेतील पदाधिकाऱयांनी सांगितले.

वकिलांविरोधात निदर्शने करणारे आमचा हक्क कसा विसरतात?

काही दिवसांपूर्वी वकिलांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ पोलिसांनी निदर्शने केली होती. तेच पोलीस विद्यार्थ्यांनाही आंदोलनाचा हक्क आहे हे कसे काय विसरतात, असा सवाल अंध विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. हॉस्टेलची शुल्कवाढ लागू केल्यास आम्ही परवडणाऱया शिक्षणापासून वंचित राहू असा दावाही विद्यार्थ्यांनी केला.

विद्यार्थी संघटनांचे मुंबई विद्यापीठातही आंदोलन

जेएनयूमधील फीवाढ आणि आयआयटी मद्रास येथील विद्यार्थिनी फातिमा लतीफ यांच्या आत्महत्येच्या निर्षधार्थ बुधवारी मुंबई विद्यापीठात अनेक समविचारी संघटनांनी आंदोलन केले. विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसमध्ये हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात एसआयओ, सम्यक विद्यार्थी आंदोलन, छात्रभारती, वेलफेअर पार्टी, बंधुत्व चळवळीसह विविध संस्था, राजकीय गट आणि विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. सरकारने फी वाढ रद्द करून आर्थिकदृष्टय़ा मागास, दलित आणि अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना परवडणारे शिक्षण द्यायला हवे, अशी मागणी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी केली. तसेच फातिमा लतिफ या विद्यार्थिनीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या