कन्हैया कुमार, उमर खालिदसह 10 जणांवर देशद्रोहाचा खटला चालणार; राज्य सरकारची मंजुरी

1453

जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष आणि सीपीआय नेते कन्हैया कुमार, उमर खालिदसह 10 आरोपींविरोधात देशद्रोहाचा खटला चालवण्यास दिल्लीतील केजरीवाल सरकारने मंजुरी दिली आहे. केजरीवाल सरकारच्या कायदेविषयक विभागाने दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला हा खटला चालवण्याची मंजुरी दिली आहे. गेल्या एक वर्षांपासून हे प्रकरण दिल्ली सरकारकडे पडून होते, अखेर दिल्ली सरकारने शुक्रवारी यावर निर्णय घेतला.

जेएनयूच्या कॅम्पसमध्ये 9 फेब्रुवारी 2016 रोजी संसदेवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी अफजल गुरू आणि मकबूल भट यांना देण्यात आलेल्या फाशीविरोधात आंदोलन करण्यात आले होते. हे प्रकरण तापल्यानंतर कन्हैया कुमार, उमर खालिद आणि अनिर्बान यांना अटक करण्यात आली होती. जेएनयू कॅम्पसमध्ये आयोजित आंदोलनामध्ये देण्यात आलेल्या घोषणाबाजीचे समर्थन केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यावेळी कन्हैया कुमार जेएनयूएसयूचा अध्यक्ष होता. या अटकेविरोधात देशभरातील अनेक विद्यापीठांमध्ये आंदोलनही करण्यात आली होती. यानंतर तिघांना जामीन देण्यात आला होता. या प्रकरणी आता कन्हैया कुमारसह 10 जणांवर देशद्रोहाचा खटला चालणार आहे.

विशेष म्हणजे 19 फेब्रुवारी रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देशद्रोहाप्रकरणातील आरोपी कन्हैया कुमारसह अन्य विरोधातील खटला चालवण्याचे संकेत दिले होते. दिल्लीतील एका न्यायालयाने आप सरकारला देशद्रोहाचा खटला चालवण्यासंबंधी मंजुरी देण्यासाठी 3 एप्रिलपर्यंत मुदत दिली होती. याचवेळी केजरीवाल यांनी संबंधित विभाग यावर लवकरच निर्णय घेईल असे म्हटले होते. मला या खटल्यासंबंधित विभागाला आदेश देण्याचे अधिकार नाहीत. मी विभागाचा निर्णयही बदलू शकत नाही, परंतु यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यासंबंधी पाठपुरावा करेन, असे केजरीवाल म्हणाले होते.

14 जानेवारीला आरोपपत्र दाखल
जेएनयूएसयूचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार, जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांच्यासह अन्य आरोपींविरोधात 14 जानेवारीला न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. या आरोपपत्रामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले की, सर्व आरोपींनी 9 फेब्रुवारी, 2016 ला जेएनयू कॅम्पस परिसरामध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये संसदेवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी अफजल गुरू आणि मकबूल भट यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली आणि याचे समर्थन केले. तसेच मिरवणूकही काढली, असेही यात नमूद करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या