
ज्या ओल्ड ट्रफर्डवर हिंदुस्थानी फलंदाजांनी एकेका धावेसाठी जणू डोंगर फोडला. तेथेच इंग्लंडच्या फलंदाजांनी हिंदुस्थानी गोलंदाजांनाच फोडून काढत त्याच डोंगरावर तिसऱया दिवसअखेर 7 बाद 544 धावांचे उत्तुंग हॉटेल उभारले. इंग्लंडकडे आता 186 धावांची जबरदस्त आघाडी असून त्यांनी अॅण्डरसन-तेंडुलकर ट्रॉफीवर कब्जा मिळवण्याच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले आहे. तिसऱया दिवसाचा खेळ थांबला तेव्हा कर्णधार बेन स्टोक्स 77 आणि लियाम डॉसन 24 धावांवर खेळत होते.
गुरुवारी 2 बाद 225 धावा अशी बॅझबॉल सुरुवात करणाऱया इंग्लंडने आज हिंदुस्थानच्या एकाही गोलंदाजाला कसोटीत कमबॅक करण्याची संधी दिली नाही. ज्यो रुटने विक्रमी 38 वे शतक ठोकताना बेन स्टोक्ससह 142 धावांची भागी रचत संघाला पाचशेसमीप नेले. स्टोक्स स्नायू ताणल्यामुळे जखमी निवृत्त झाला होता. पण तो व्होक्स बाद झाल्यावर पुन्हा मैदानात परतला आणि खेळाचा ताबा आपल्या हातात घेतला. हिंदुस्थानचा एकही गोलंदाज आज इंग्लिश फलंदाजांना रोखू शकला नाही. त्यामुळे हिंदुस्थानची कसोटीवरील पकडही ढिली झाली.
रुट विक्रमी मार्गावर
2 – ज्यो रुटने 150 धावांची खेळी करताना राहुल द्रविड (13,288), जॅक पॅलिस (13,289) आणि रिकी पॉण्टिंग (13,378) या तिन्ही दिग्गजांना मागे टाकले. आता कसोटी इतिहासात त्याच्या 13,380 धावा झाल्या असून सर्वाधिक धावा करणाऱया फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकर (15,921) हाच त्याच्या पुढे आहे.
38 – रुटने आपल्या कसोटी कारकीर्दीत 38 वे शतक साजरे करत कुमार संगक्काराची बरोबरी साधली. आता त्याच्यापुढे सचिन (51), पॅलिस (45) आणि पॉण्टिंग (41) हे तिघेच शतकवीर आहेत.
104 – रुटने आज आपल्या कारकीर्दीत 104 वे अर्धशतक (38 शतक आणि 66 अर्धशतके) साकारत पॉण्टिंग आणि पॅलिसच्या (103) अर्धशतकांना मागे टाकले. आता सचिनच (119) एकटा त्याच्यापुढे आहे.
12 – हिंदुस्थानविरुद्ध रुटने बारावे शतक झळकावत स्टीव्हन स्मिथच्या 11 शतकांना मागे टाकले. आता फक्त डॉन ब्रॅडमन (इंग्लंडविरुद्ध 19 शतके) आणि सुनील गावसकर (विंडीजविरुद्ध 13 शतके) हे दोघे पुढे आहेत.
23 – रुटने आपल्या मायदेशात (इंग्लडमध्ये) आपले 23 वे शतक साकारत पॉण्टिंग, पॅलिस आणि जयवर्धने यांच्या मायदेशातील सर्वाधिक 23 शतकांच्या विक्रमाची बरोबरी साधली.
1099 – त्याने ओल्ड ट्रफर्डवर आज हजार धावांचा टप्पा गाठला. तो या मैदानावर हजार धावा करणारा पहिलाच फलंदाज असून त्याने लॉर्ड्सवरही (2166) हजार धावांचा टप्पा गाठला आहे.