
इंग्लंडचा विक्रमी फलंदाज ज्यो रूटने मुख्य प्रशिक्षक ब्रॅण्डन मॅकलमच्या आगमनानंतर आपल्या क्रिकेट खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याचा खुलासा केला आहे.
2017 ते 2022 या काळात इंग्लंडचे नेतृत्व करणार्या रूटच्या फॉर्ममध्ये अनेक चढउतार आले. नेतृत्व काळात 64 कसोटींमध्ये 46.44 सरासरीने 14 शतके व 5,295 धावा त्याने केल्या. मात्र, शेवटच्या 17 कसोटीत इंग्लंडला केवळ एक विजय मिळवता आला होता. कोविडच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या काळात संघातील कामगिरी अत्यंत घसरली होती. अशा परिस्थितीत मॅकलम आपल्या ’बॅझबॉल’ शैलीसह इंग्लंडच्या कसोटी संघात दाखल झाला व बेन स्टोक्सकडे नेतृत्व सोपवण्यात आले. त्यानंतर रूटच्या फलंदाजीला नवी ऊर्जा मिळाली आणि त्याच्या फलंदाजीचा सारा नूरच पालटला. गेल्या केवळ 41 सामन्यांत त्याने 58.00 सरासरीने 14 शतके ठोकली व 3,654 धावा केल्या.
रूटच्या मते बॅझसोबत काम केल्याने माझा खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. तांत्रिक गोष्टींवर हट्टाने अडून न राहता, खेळ कसा करावा आणि समस्यांचे निराकरण कसे करावे, यावर लक्ष पेंद्रित केले. वेगळा दृष्टिकोन असलेला माणूस माझ्या खेळात मोठा हातभार लावतोय, ही माझ्यासाठी प्रेरणादायी बाब असल्याचेही रुट म्हणाला.
आतापर्यंत 158 कसोटीत 13,543 धावा व 39 शतके झळकावूनही रूट आपला खेळ अधिक परिपक्व करण्याच्या प्रयत्नात आहे. कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विक्रम असलेल्या सचिन तेंडुलकरच्या (15,921) जवळ तो पोहोचला असला, तरी हा विक्रम मोडण्याची त्याला प्रेरणा नाही.
खेळाडू म्हणून माझी प्रेरणा म्हणजे सातत्याने प्रगती करत राहणे, प्रतिस्पर्ध्यांपेक्षा एक पाऊल पुढे राहणे आणि कधीही स्थिर न राहणे. मी रचनात्मक व सुधारणा करणारा राहू इच्छितो, असे रूट म्हणाला. आता 21 नोव्हेंबरपासून सुरु होणार्या अॅशेस मालिकेत रुटला आणखी विक्रम मोडीत काढण्याची संधी लाभणार आहे.