भाजपमध्ये प्रवेश घ्या, कर्जमाफी मिळवा! मिंधे सरकारचा नवा फंडा, कुंडलवाडी सोसायटीचे 2 कोटी कर्ज माफ

भाजपमध्ये प्रवेश घ्या आणि कर्जमाफी मिळवा, असा नवीनच फंडा राज्यातील मिंधे सरकारने आणला आहे. जिल्ह्यातील कुंडलवाडीच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने जलसिंचन योजनेसाठी घेतलेले दोन कोटी रुपयांचे कर्ज मिंधे सरकारने माफ केले आहे. सोसायटीचे संचालक मंडळ भाजपवासी होताच मिंधे सरकारने ही कर्जमाफीची फुले उधळली!

नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ‘आदर्श’ घोटाळ्याच्या चौकशीला घाबरून भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशाबद्दल त्यांना राज्यसभेची खासदारकी बक्षीस म्हणून देण्यात आली. चव्हाणांपाठोपाठ कुंडलवाडी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळानेही भाजपवासी होण्याचा निर्णय घेतला. सोसायटीचा भाजपमध्ये प्रवेश होताच मिंधे सरकारने या सोसायटीचे 2.5 कोटी रुपयांचे कर्ज उदार अंत:करणाने माफ केले.

असा आहे बोजा

कुंडलवाडी सोसायटीच्या माध्यमातून 1985 मध्ये कुंडलवाडी, शेळगाव, चन्नापूर, पाटोदा, माष्टी या गावासाठी उपसा जलसिंचन योजनेचे काम सुरू करण्यात आले. त्यासाठी एकूण 2 कोटी 5 लाख रुपयांचे कर्ज जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून घेण्यात आले. त्याचा बोजा 569 शेतकर्‍यांच्या सातबारावरही टाकण्यात आला. 1994 मध्ये हे काम पूर्ण झाले. परंतु गोदावरीत पाणी नसल्याने योजना कार्यान्वित झाली नाही आणि शेतकर्‍यांना थेंबभरही पाणी मिळाले नाही. पण कर्ज मात्र बोडक्यावर बसले.

सहकार आयुक्तांना प्रस्ताव द्यावा लागणार

अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर कुंडलवाडी सोसायटीचे कर्ज अटीशर्तीवर माफ करण्यात आल्याचा आदेश 18 जूनला काढण्यात आला. या कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी जिल्हा बँकेने सर्वसाधारण सभेचा ठराव घेऊन सहकार आयुक्तांना प्रस्ताव पाठवणे गरजेचे आहे. असाच प्रस्ताव शासनालाही द्यावा लागणार आहे. त्यानंतरच ही रक्कम संबंधित कर्जखात्यावर वर्ग होईल.