पत्रकार नितीन चव्हाण (53) यांचे सोमवारी मध्यरात्री दीर्घ आजाराने विक्रोळी येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर टागोरनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
नितीन चव्हाण हे गेली 27 वर्षे पत्रकारितेत होते. ‘मुंबई तरुण भारत’, ‘सकाळ’, दै. ‘सामना’ आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’ आदी वृत्तपत्रांमध्ये त्यांनी काम केले होते. 20 वर्षांपासून मुंबई महापालिकेचे ते वार्तांकन करीत होते. 2018 पासून चव्हाण हे फुप्फुसाच्या आजाराने त्रस्त होते. त्यावर फुप्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हाच शेवटचा पर्याय होता. दीर्घ आजारातून ते बरे व्हावेत यासाठी सर्व सहकारी पत्रकार, मित्र परिवार आणि दानशूर व्यक्तींनी शक्य होईल त्याप्रकारे प्रयत्न केले होते. मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दिल्या जाणाऱ्या ‘कॉ. तु. कृ. सरमळकर स्मृती’ पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते.