राज्यात योजनांचा बागुलबुवा करत असाल पण पालघर जिल्ह्यातील समस्यांचे काय, असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच मिंधे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बोलती बंद झाली. त्यामुळे गोची झालेल्या जिल्हाप्रमुखांना पत्रकारांसमोर सारवासारव करत वेळ मारून न्यावी लागली. अवघ्या काही प्रश्नांनंतरच मिंधे गटाला ही पत्रकार परिषद गुंडाळावी लागली.
मिंधे गटाच्या दोन जिल्हाप्रमुखांनी पालघर, बोईसर, डहाणू, विक्रमगड विधानसभा मतदारसंघाच्या आढावासाठी वेगवेगळ्या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यामुळे पालघरमध्ये मिंधे गटात फूट पडल्याचे दिसून येत आहे. दोन्ही ठिकाणी राज्यात केलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. राज्याचे सोडा पालघर जिल्ह्यातील विविध समस्यांचे काय, असे प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर मिंधे गटाने उडवाउडवीची उत्तरे दिली. रोजगार, बेरोजगार, मुलांना गणवेश नाही, ट्रामा केअर सेंटरचे बांधकाम, वारली हाट, मुंबई-अहमदाबाद महामार्गाची अवस्था, युवा प्रशिक्षणमध्ये युवकांची अवस्था, स्थलांतर, रोजगार हमी योजना अशा अनेक प्रश्नांचा भडीमार करताच मिर्धेच्या पदाधिकाऱ्यांनी परिषदा आटोपत्या घेतल्या.
थातूरमातूर उत्तरे
जिल्ह्यातील समस्यांबाबत आम्ही नक्कीच विचार करू, या सर्व समस्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू, अशी थातूरमातूर उत्तरे पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांना दिली. महायुती एवढे मोठे काम करत असेल तर समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाचे काय झाले, असा प्रश्न विचारल्यानंतर मिंधे गट निरुत्तर झाला. वाढवण प्रश्नावर या पत्रकार परिषदेत मिंधे गटाकडून पडदा टाकण्यात आला. वाढवण बंदराविषयी विचारलेल्या एकाही प्रश्नाला मिंधे गटाच्या पदाधिकाऱ्याने उत्तर दिले नाही. या प्रकारामुळे मिंधे गट चांगलाच तोंडावर आपटला आहे.