महाव्यवस्थापकांच्या कृपेने उद्यापासून बेस्टची जॉय राइड

सामना प्रतिनिधी । मुंबई

बेस्टच्या महाव्यवस्थापकांच्या आडमुठेपणामुळे उद्यापासून बेस्टचा तिकिटांचा महसूल बुडणार आहे तर फुकटय़ा प्रवाशांना मात्र ‘जॉय राइड’चा आनंद घेता येणार आहे. बेस्टच्या बसगाडय़ांमध्ये तिकीट देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रायमॅक्सच्या मशीनला मुदतवाढ देण्यास बेस्ट समितीने नकार दिल्यामुळे तिकीट देण्यासाठी दुसरी कोणतीही यंत्रणा बेस्ट प्रशासनाकडे नाही. त्यामुळे बसमध्ये चढलेल्या प्रवाशांना तिकीट कसे द्यायचे असा प्रश्न आता कंडक्टरना पडणार आहे.

सन २०१० पासून बेस्टच्या गाडय़ांमध्ये तिकीट देण्यासाठी ज्या ट्रायमॅक्सच्या मशीन वापरल्या जात होत्या त्या तीन वर्षांनी बिघडू लागल्या. त्या जागी नवीन मशीन घेण्याऐवजी याच मशीन दुरुस्त करून वापरण्याचा अट्टहास महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी सुरू ठेवला आहे. याच कंपनीला पुन्हा मुदतवाढ देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आधीच ७० टक्के मशीन नादुरुस्त असताना आणि रोज बेस्टला लाखोंचा तोटा होत असल्यामुळे समितीने त्याला मान्यता दिली नाही. त्यामुळे आता या मशीनची दुरुस्ती होऊ शकणार नाही. आधीच खुळखुळा झालेल्या या मशीनची दुरुस्तीही रखडणार असल्यामुळे आता तिकिटांचे चांगलेच वांदे होणार आहेत. महाव्यवस्थापकांच्या हट्टामुळे बेस्टमध्ये काळाची चाके पुन्हा उलट फिरू लागली असून मशीनवरून पुन्हा एकदा तिकिटांची टिकटिक सुरू झालेली आहे.

समितीच्या मानेवर बंदूक

ट्रायमॅक्सला दिलेली मुदतवाढ ३० जून रोजी संपल्यानंतर आणि ११ जुलैला दुरुस्तीचे कंत्राट संपल्यानंतर १३ जुलैला महाव्यवस्थापकांनी ट्रायमॅक्सच्या मुदतवाढीचा प्रस्ताव आयत्या वेळी आणला. तिकीट यंत्रणा कोलमडण्याची शक्यता लक्षात घेऊन समिती याला मान्यता देईलच अशा भ्रमात प्रशासन होते. मात्र सर्वपक्षीय सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन अध्यक्ष आशीष चेंबूरकर यांनी हा धाडसी निर्णय घेऊन प्रशासनाला आता नवीन यंत्रणा आणण्यास भाग पाडले आहे.

बसपासवाल्यांपुढे कंडक्टर हतबल

बसपास असल्याचे सांगणाऱया प्रवाशांपुढे कंडक्टर अक्षरशः हतबल झाले आहेत. बसपास असला तरी तो मशीनमध्ये स्कॅन करून तपासता येत नाही. तर प्रवाशाला तिकीटही आकारता येत नाही, अशी प्रतिक्रिया एका वाहकाने व्यक्त केली आहे.

फुकटय़ा प्रवाशांचे फावणार

मशीन बंद पडत असल्यामुळे कंडक्टरला जुन्या पद्धतीच्या पेटीबंद पेपर तिकीट सोबत बाळगाव्या लागत होत्या. मशीन आणि पेपर तिकीट असे दोन्ही पर्याय वापरण्याचा महाव्यवस्थापकांचा अट्टहास आहे. मात्र पेपर तिकीट कालबाह्य झाल्यामुळे आताच्या वाहकांना पेपर तिकीटचे गणित करण्याची सवय सुटलेली आहे. नवीन तिकिटे पुरेशी छापलेली नसल्यामुळे वाहकांचा गोंधळ उडत असल्याची माहिती कामगार सेनेचे सुहास सामंत यांनी दिली. तर कॅश मोजणारा विभाग गेल्या काही वर्षांत पूर्ण कोलमडलेला आहे. अशा परिस्थितीत नवीन मशीन्स घेण्याची गरज असताना कामगारांच्या खांद्यावर ओझे देण्याची गरज काय, असा सवाल सामंत यांनी केला आहे.

दुरुस्तीचे बघू

ट्रायमॅक्सला मुदतवाढीला समितीने मंजुरी दिलेली नसली तरी बेस्टकडे पुरेशा पेपर तिकीटस् असल्याचा दावा महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी केला आहे. सध्या असलेल्या मशीन आणि पेपर तिकीट यामुळे तिकिटांचे वांदे होणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मशीन बंद पडल्या तर दुरुस्ती कशी करणार यावर मात्र त्यांच्याकडे अद्याप तरी उत्तर नाही.

१२९ कोटींचे उत्पन्न बुडाले

वर्षभरातील उत्पन्नातील घट : १२९ कोटी

मासिक

सरासरी घट : १०.८१ कोटी

आपली प्रतिक्रिया द्या