
अनंत सोनवणे
कर्नाटकातील रंगनथिट्टू पक्षी अभयारण्य. या प्रदेशातील पक्ष्यांची काशीच जणू…
बांदीपूर आणि काबिनी जंगलाची आमची ती भेट अपेक्षेपेक्षाही खूप जास्त यशस्वी झाली होती. एक पूर्ण वाढ झालेला नर वाघ, 13 बिबटे, अस्वल-हत्ती-गव्यांसह अनेक सस्तन वन्यजीव आणि दुर्मिळ गिधाडासह असंख्य पक्ष्यांचे दर्शन अशी भरगच्च शिदोरी घेऊन आम्ही अत्यंत आनंदात परतीच्या प्रवासाला लागलो होतो. मी आणि बायको असे आम्ही दोघंच स्वप्नवत भासाव्या अशा या बांदीपूर- काबिनी भेटीला आलो होतो. परतीच्या प्रवासात एक रात्र मैसूरमध्ये काढायची होती आणि दुसऱया दिवशी बंगळुरू विमानतळावरून मुंबईकडे उड्डाण करायचे होते. त्यामुळे ती संध्याकाळ मैसूर शहरात भटकू असा आमचा विचार होता. मात्र बांदीपूर-काबिनी भेटीदरम्यान बंगळुरूची दोन तरुण मुले भेटली. ती पहिल्यांदाच जंगल भटकंतीला आली होती. त्यांच्याशी गप्पा मारताना मैसूरजवळच एक छोटेसे पक्षी अभयारण्य असल्याचे समजले होते. म्हणून मग नुसतेच शहरात भटकण्यापेक्षा किंवा शॉपिंग वगैरे करण्यापेक्षा ‘बघून तर येऊ सहजच’ असा विचार करून आम्ही त्या पक्षी अभयारण्याला भेट द्यायचं ठरवलं- फारशा अपेक्षा न बाळगता! आणि प्रत्यक्षात तिथे गेल्यावर त्या दोन तरुण मित्रांना फोन करून लाख-लाख धन्यवाद दिले! त्या चिमुकल्या अभयारण्याने आमच्या ट्रीपचा शेवट गोड केला.
त्या अभयारण्याचे नाव होते रंगनथिट्टू पक्षी अभयारण्य. सगळा परिसर जेमतेम 16 चौ. हेक्टरचा. पण तिथले पक्षी वैभव पाहिले की मन थक्क होते. ऐतिहासिक श्रीरंगपट्टण शहरापासून जेमतेम तीन तर मैसूरपासून 16 कि.मी. अंतरावर हे छोटेसे पक्षीजगत आहे. कावेरी नदीच्या काठावर छोटय़ा-छोटय़ा अशा एकूण सहा बेटांनी रंगनथिट्टू पक्षी अभयारण्याचा परिसर बनलाय. 1648 साली मैसूरच्या तेव्हाच्या राजांनी कावेरी नदीवर बंधारा बांधला त्यावेळी ही छोटी बेटे निर्माण झाली.
आजमितीस रंगनथिट्टू हे पक्षीप्रेमींचे लाडके अभयारण्य ठरलेय. इथे 170 हून अधिक प्रजातींचे पक्षी पाहायला मिळतात. इथे स्थानिक तसेच स्थलांतरित पक्ष्यांची नुसती रेलचेल आहे. त्यात अर्थातच प्रामुख्याने पाणपक्ष्यांची संख्या प्रचंड आहे. हे अभयारण्य पर्यटकांसाठी वर्षभर खुले असले तरी इथे भेट देण्याचा आदर्श ऋतू म्हणजे हिवाळा. डिसेंबरपासून सैबेरिया, लॅटिन अमेरिका तसेच उत्तर हिंदुस्थानातून इथे पक्ष्यांचे स्थलांतर सुरू होते. मग हा परिसर अक्षरशः गजबजून जातो. एका अंदाजानुसार या काळात इथे 40 हजार पक्ष्यांचा निवास असतो.
पक्ष्यांचे व्यवस्थित निरीक्षण करता यावे यासाठी इथे बोटिंगची व्यवस्था करण्यात आलीय. आपल्या दोन्ही बाजूंना विविध प्रजातींच्या पक्ष्यांच्या भरगच्च वसाहती दिसतात. प्रत्येक पक्ष्याचे घरटे त्याच्या आकारमान आणि गरजेनुसार रचनेचे. सर्व वसाहतींमध्ये अव्याहत संमिश्र किलबिलाट आणि कोलाहल. पंखांचा फडफडाट. कोणी अंडी उबवत निश्चल बसलंय तर कोणी पिलांना भरवतंय, तर कुणी भक्ष्याच्या शोधात आकाशात झेपावतंय किंवा पाण्यात सूर मारतंय. अधूनमधून पाण्याबाहेर डोकावणारे भूपृष्ठावरही याच साऱया पक्ष्यांचे सूर-संमेलन भरलेले. एखादा पाणकावळा पंख पसरून पिसे वाळवत बसलेला तर एखादा स्पूनबिल आपली चमच्यासारखी चोच शुभ्र पंखांमध्ये खुपसून उभा, एखादा करकोचा माश्याचा वेध घेण्यासाठी दबकत पावले टाकतोय तर एखादा बगळा एक पाय उचलून ध्यानस्थ झालेला! किती पक्षी! त्यांच्या किती तऱहा! आणि हे सारे एकत्र सुखाने नांदतायत! एका पक्षीप्रेमीला आणखी काय हवे?
पावसाळय़ात खूप जास्त पाऊस पडला तर काही वेळा केआरएस धरणाचे दरवाजे उघडले जातात. मग रंगनथिट्टूच्या बेटांच्या परिसरात खूप येतो. अशावेळी बोटिंग बंद ठेवले जाते. मात्र तेव्हाही पक्षी निरीक्षक काठावरून पक्ष्यांचे निरीक्षण करू शकतात. अर्थात हिवाळय़ात इथली जलसफारी म्हणजे जणू नंदनवनातली फेरी. विशेष म्हणजे जलसफारीदरम्यान पाण्यात पोहणारी मगरही पहायला मिळते. त्याशिवाय माकडे, मुंगूस, उदमांजर, घोरपड आदी वन्यजीवही इथे दिसू शकतात.
प्रमुख आकर्षण…पाणपक्षी
जिल्हा…मंडया
राज्य…कर्नाटक
क्षेत्रफळ…40 चौ.कि.मी.
निर्मिती…1940
जवळचे रेल्वे स्थानक…श्रीरंगपट्टण
(3 कि.मी.)
जवळचे विमानतळ…मैसूर (25 कि.मी.)
निवास व्यवस्था…श्रीरंगपट्टण व मैसूरमध्ये खासगी हॉटेल्स
योग्य हंगाम…नोव्हेंबर ते जून
सुट्टीचा काळ…नाही
साप्ताहिक सुट्टी…नाही
























































