दुबार शिक्षकांच्या वेतनाचा मार्ग मोकळा, ऑनलाइन पेमेंट देण्यास शिक्षण विभागाची मंजुरी

मुंबई विभागातील ज्युनियर कॉलेजमध्ये तसेच नाईट कॉलेजमध्येही नोकरी करणाऱ्या दुबार शिक्षकांच्या वेतनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या शिक्षकांना ऑफलाईन पद्धतीने वेतन देण्यास शालेय शिक्षण विभागाने मंजुरी दिली आहे.

मागील नऊ महिन्यांपासून विनावेतन काम करणाऱ्या  दुबार शिक्षकांच्या वेतनाप्रश्नी शिक्षक भारतीच्या वतीने आमदार कपिल पाटील शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करीत होते. अखेर शालेय शिक्षण विभागाच्या कक्ष अधिकारी कविता तोंडे यांनी दुबार शिक्षकांचे अर्धवेळ पदावरील वेतन ऑफलाइन पद्धतीने देण्यात येणार असल्याचे पत्र जारी केले असल्याचे शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी स्पष्ट केले.

१७ मे २०१७ रोजी  शिक्षण विभागाने शासन निर्णय काढून दुबार शिक्षकांचे वेतन बंद केले होते. रात्र कनिष्ठ महाविद्यालयात अतिरिक्त शिक्षक नसल्याने दुबार काम करणाऱ्या शिक्षकांचे वेतन पूर्ववत सुरू करण्यात आले होते. परंतु डिसेंबर २०१९ पासून ऑनलाइन प्रक्रियेततून वगळण्यात आल्याने दुबार  काम करणाऱ्या नाईट कॉलेजमधील व दिवसा कनिष्ठ महाविद्यालयात अर्धवेळ पदावर काम करणाऱ्या शिक्षकांचे पगार बंद करण्यात आले होते.  याविरोधात शिक्षक भारतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयावर अनेकदा निदर्शने केली. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पुढील आदेश येईपर्यंत ऑफलाईन पगार काढण्याचे मंजुरी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या